रोजगारासाठी आलात, रोजगार करा, राजकारण करून आमच्या डोक्यावर बसू नका – गोवर्धन देशमुख
अरविंद जोशी
मिरा – भाईंदर: मराठी एकीकरण समितीने आज आपला निवडणुकीसाठीचा वचननामा प्रसिद्ध केला. काही दिवसांवर आलेल्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि नागरिकांसाठी असलेला हा वचननामा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी पत्रकारांना वाचून दाखवला.
मराठी राज्यामध्ये तुम्ही रोजगार, व्यवसाय करण्यासाठी आलात आता तुम्ही राजकारण करू नका आणि करणार असाल तर तुम्हाला मराठी नागरिकांसाठी काम करावं लागेल. मराठी विरुद्ध अमराठी असा प्रश्न नसलाच पाहिजे हे राज्य मराठी आहे इथे मराठीचेच वर्चस्व असेल. मराठी अमराठी वाद हा राजकारणी घडवून आणत आहेत. हे राज्य मराठी नाही, शहर मराठी राहिलं नाही याविरुद्ध राजकारण्यांनी भूमिका घेतली पाहिजे. स्थानिकांचा विकास हाच शहराचा विकास असं ठाम प्रतिपादन अध्यक्ष देशमुख यांनी केलं. मराठीपण आणि मराठी संस्कृती जपण्यासाठी पक्षाने ही वचनं पाळावीत, असं त्यांनी पुढे म्हटलं. आम्ही सगळ्यांना आवाहन करत आहोत की, सगळ्यांनी मराठी उमेदवारांना निवडून आणावं आणि उमेदवारानी मराठी जाहीरनामा पाळावा.
या राजकारणाचा आता चिखल झालेला असून या एकीकरण समिती मार्फत आम्ही एक समांतर व्यवस्था निर्माण करीत आहोत, राजकीय लोकांची नाटकं आता मराठी माणूस सहन करणार नाही, त्यासाठीच हा वचननामा असं त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मिरा-भाईंदरमध्ये कधीच मराठी अमराठी वाद नव्हता, आमदार नरेंद्र मेहता यांनी शहराला गृहीत धरलं असून त्यांचा सोशल मीडिया हा हिंदीतच आहे. या चुकीच्या माणसाने हा वाद घातलाय, जो स्वतःला या शहराचा बाप समजतो, याच्यामुळेच शहरात वाद निर्माण झालाय. आम्ही कुठेच अमराठी महापौर होऊ देणार नाही असा इशारा शेवटी त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *