ठामपा निवडणुकीत ३२ प्रभागांमध्ये चार तर एका प्रभागात तीन उमेदवारांना मतदान केल्यावरच प्रक्रिया पूर्ण – सौरभ राव
अनिल ठाणेकर
ठाणे- ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६साठी ठाणे महापालिका क्षेत्रातील एकूण ३३ प्रभागांमध्ये विभाजन करण्यात आले असून १३१ नगरसेवकांच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रभाग क्रमांक १ ते २८ व ३० ते ३३ या ३२ प्रभागात प्रत्येकी चार जागांसाठी मतदान होणार असून प्रभाग क्र.२९ मध्ये तीन जागांसाठी मतदान होणार असल्याचे आयुक्त आणि निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केले.
हे मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या सहाय्याने घेण्यात येणार असून बॅलेट युनिटवर संबंधित प्रभागानुसार तीन किंवा चार मतपत्रिका उपलब्ध असणार आहे.प्रत्येक प्रभागातील जागांना अ,ब,क,ड अशी नावे देण्यात आली आहेत. प्रत्येक प्रभागात ‘अ’ जागेची पहिली मतपत्रिका पांढऱ्या जागेची, ‘ब’ जागेची दुसरी मतपत्रिका फिकट गुलाबी रंगाची, ‘क’ जागेची तिसरी मतपत्रिका फिकट पिवळ्या रंगाची आणि चौथी ‘ड’ जागेची मतपत्रिका फिकट निळ्या रंगाची असणार आहे.प्रत्येक मतदाराला वरीलप्रमाणे चारही जागांसाठी मतदान करणे बंधनकारक असणार (प्रभाग क्र. २९ साठी तीन मते) आहे. प्रत्येक जागेसाठी उमेदवारांसह ‘नोटा’ (NOTA वरीलपैकी एकही नाही) हा पर्याय मतदारास उपलब्ध असणार आहे.मतदारांनी चारही जागांसाठी मतदान पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातून शिट्टीचा आवाज येऊन यंत्रावरचे दिवे बंद होणार आहे. त्यानंतर मतदान यंत्र पुढील मतदाराच्या मतदानासाठी पुन:श्च उपलब्ध होणार आहे. मतदारांनी चारही जागांसाठी मतदान न करता एक अथवा दोन अथवा तीन जागांसाठी प्रत्येकी एक मत नोंदवून मतदान कक्षाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधित मतदारास पुन्हा मतदान कक्षात पाठवून उर्वरित मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना मतदान अधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. चार किंवा (प्रभाग क्र. २९साठी तीन) मते नोंदविल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. थोडक्यात मतदारांनी सर्व अर्थात चारही (प्रभाग क्र. २९साठी तीनही) जागांसाठी आपल्या पसंतीप्रमाणे मत नोंदवावे. मतदारांनी निर्भयपणे, जागरूकतेने व पूर्ण मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन निवडणूक आयोग व महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी केले आहे.
