पर्यटकांसाठी सुलभ शौचालय ताबडतोब सुरू करावीत
पर्यटकांची मागणी
मुकुंद रांजाणे
माथेरान: केवळ पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या इथल्या सर्वच व्यावसायिक, दुकानदार, हॉटेल इंडस्ट्री,लॉज धारक, सर्वसामान्य स्टॉल वाले, हमाल,मजूर, रिक्षावाले, घोडेवाले या सर्वांचा व्यवसाय आणि उदरनिर्वाह पर्यटन शेतीवर अवलंबून आहे. याठिकाणी संपूर्ण परिसर, भूभाग हा खडकाळ असल्यामुळे पर्यटक आल्यासच सर्वांची उपजीविका भागू शकते. मुख्यतः नगरपरिषदेला प्रवासी कराच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल जमा होत आहे.वनखात्याला सुध्दा पार्किंगच्या माध्यमातून भरीव उत्पन्न मिळते. परंतु पर्यटकांना अद्ययावत सोयीसुविधा देण्यात येत नाहीत.वाहतुकीची उत्तम प्रकारे सुविधा, चांगल्या दर्जाचे रस्ते, वीज, जागोजागी शौचालय, बसण्यासाठी बाके,मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज उद्यान आणि स्वच्छता याव्यतिरिक्त पर्यटकांना काही अपेक्षा नसतात त्या पूर्ण करण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाने प्रयत्न केल्यास निश्चितच याठिकाणी पर्यटकांची संख्या वाढून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
कोट
माथेरान मध्ये फिरण्यासाठी उत्तम ठिकाणे आहेत. रमणीय पॉईंट्स त्याचबरोबर एको पॉईंट, लेक, लुईझा पॉईंट अशी सुंदर स्थळे मनाला समाधान देत आहेत. परंतु येणाऱ्या पर्यटकांना साधे सुलभ शौचालय उपलब्ध नाही ही खंत वाटते. संबंधित प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.
प्रज्ञेश कुलकर्णी—पर्यटक मुंबई
कोट
माथेरानचा सुप्रसिद्ध एको पॉईंट येथे पर्यटकांना विशेषतः महिलांना शौचालया अभावी जंगलाचा आधार लागत आहे. अधिकारी वर्गांना अनेकदा निवेदने देऊन सुद्धा मुख्य शौचालयांची कामे काही केल्या पूर्ण होत नाहीत. यामध्ये नक्की काय गौडबंगाल आहे. फॉरेस्ट ऑफिसमध्ये विचारपूस केल्यास नगरपरिषदेचे नाव सांगतात तर नगरपरिषदेला विचारपूस केल्यास फॉरेस्टचे नाव सांगत आहेत.अधिकारी वर्ग जबाबदारी घेण्यास पुढे येत नाहीत. या गावात संबंधित अधिकारी हे फक्त महिन्याला पगार घेण्यासाठीच आहेत की काय? पर्यटकांकडून ५० रुपये प्रवासी कर वसुली केली जाते.तर पर्यटकांना सुविधा निर्माण करून दिल्या पाहिजेत.
राकेश कोकळे—अध्यक्ष धनगर समाज माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *