अमर हिंद मैदानावर ‘खो-खो’चा महायज्ञ
थरार, चपळाई आणि इतिहासनिर्मितीचा संगम!
मुलींच्या गटात रा. फ. नाईकची सरशी, मुलांच्या गटात ज्ञानविकास विद्यालयाची ऐतिहासिक बाजी
मुंबई . दादरच्या अमर हिंद मातीत च्या उसळले खो-खोचे रण. धुळीचे लोट उडवत, श्वास रोखून धरायला लावणाऱ्या पकडी, सेकंदाच्या फरकाने दिलेल्या हुलकावण्या आणि प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढवणारा खेळ दादरच्या ऐतिहासिक अमर हिंद मंडळाच्या मैदानावर आंतरशालेय खो-खो स्पर्धेने अक्षरशः क्रीडाप्रेमींना वेड लावले! कै. उमेश शेणॉय यांच्या स्मरणार्थ आयोजित या स्पर्धेत मुंबई, उपनगर व ठाण्यातील २७ शाळांनी सहभाग नोंदवत खो-खोची परंपरा, वेग आणि डावपेच यांचा अप्रतिम संगम सादर केला. प्रत्येक सामना म्हणजे जिद्दीची चाचणी आणि कौशल्याची कसोटी ठरली.
उद्घाटनाचा मंगल शंखनाद. प्रेरणेची स्फूर्ती
स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन अमर हिंद मंडळाचे माजी राज्यस्तरीय व विद्यापीठीय खेळाडू तसेच सध्या ॲक्सिस बँकेत कार्यरत असलेले अमित चिखलकर यांच्या हस्ते झाले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी खेळाडूंमध्ये नवी ऊर्जा संचारली. स्पर्धेत १२ मुलींचे व १५ मुलांचे संघ विजयाच्या ध्यासाने मैदानात उतरले.
मुलींचा अंतिम रणसंग्राम , रा. फ. नाईकचे वर्चस्व
मुलींच्या अंतिम सामन्यात रा. फ. नाईक विद्यालय, कोपरखैरणे विरुद्ध ज्ञानविकास विद्यालय, ठाणे यांच्यात चुरशीची लढत झाली. रा. फ. नाईकने ९–५ असा १ डाव राखून ४ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. श्रुती चोरमारे (४ मि. संरक्षण व ३ गुण) वैष्णवी जाधव (४ मि. संरक्षण व ३ गुण), प्रणिती जगदाळे (२.३० मि. संरक्षण १ गुण) अशी सलग व ठोस कामगिरी नोंदली. पराभूत ज्ञानविकासकडून समृद्धी कदम (१.३० मि. संरक्षण व १ गुण), प्रांजल पाटे (१.३० मि. संरक्षण व १ गुण), श्रावणी मोरे (१.३० मि. संरक्षण व २ गुण) यांनी झुंज दिली; मात्र रा. फ. नाईकच्या आक्रमणापुढे त्यांचा निभाव लागला नाही.
मुलांचा थरार . ज्ञानविकासची ‘किंगमेकर’ बाजी
मुलांच्या अंतिम सामन्यात ज्ञानविकास विद्यालय, ठाणे संघाने महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे संघावर १०–७ असा १ डाव राखून ३ गुणांनी विजय मिळवला. ज्ञानविकासच्या साहिल शिंदे (२.२० मि. संरक्षण व २ गुण), विनायक भणगे (३.५० मि. संरक्षण व १ गुण), साईराज बैकर (२.१० मि. संरक्षण व २ गुण), सार्थक वांगडे (३.५० मि. संरक्षण व १ गुण) अशी निर्णायक कामगिरी नोंदवली. तर पराभूत महात्मा गांधी विद्यामंदिरच्या तन्मय पूजारे (१ मि. संरक्षण व २ गुण), बाळकृष्ण हरळे (१.४० व १.१० मि. संरक्षण), संदेश गोमणी (१.३० मि. संरक्षण व १ गुण) यांनी दिलेला लढा कौतुकास्पद ठरला.
सन्मानाचा क्षण . विजेत्यांचा गौरव
पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून अमर हिंद मंडळाच्या राष्ट्रीय खो-खो खेळाडू श्रीम. निलिमा पारकर उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विजेत्या संघांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अरुण देशपांडे (विश्वस्त), सीमा कोल्हटकर (कार्यवाह), विजय राणे (कार्याध्यक्ष), राजेंद्र कर्णिक (कार्योपाध्यक्ष), प्रफुल्ल पाटील (खजिनदार), उत्कर्षा शेणॉय–तळेकर (संयुक्त कार्यवाह), अमित किंबहुने (संयुक्त कार्यवाह), निलेश सावंत, रोहन चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली.
वैयक्तिक चमक . स्पर्धेचे मानकरी
मुली गट—सर्वोत्कृष्ट अष्टपैलू. श्रुती चोरमारे (रा. फ. नाईक), सर्वोत्कृष्ट संरक्षक. वैष्णवी जाधव (रा. फ. नाईक), सर्वोत्कृष्ट आक्रमक. श्रावणी मोरे (ज्ञानविकास).
मुले गट—सर्वोत्कृष्ट अष्टपैलू. साहिल शिंदे (ज्ञानविकास), सर्वोत्कृष्ट संरक्षक. विनायक भणगे (ज्ञानविकास), सर्वोत्कृष्ट आक्रमक. तन्मय पूजारे (महात्मा गांधी)
