नमुंमपा निवडणुकीसाठी ईव्हीएम यंत्रणा सज्ज
आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केली पाहणी
नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणा तत्परतेने काम करीत असून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात सुरु असलेल्या ईव्हीएम यंत्रे निवडणूकीसाठी सज्ज करण्याच्या कामकाजाची महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोपरखैरणे व तुर्भे येथे पाहणी केली.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीकरिता नुकत्याच रायगड जिल्ह्यात झालेल्या नगरपरिषद निवडणूकीसाठी वापरलेली ३५०० हून अधिक निवडणूक यंत्रे महानगरपालिकेने १३ ठिकाणांहून ताब्यात घेतली असून त्याची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झालेली आहे. मध्यप्रदेशातून आणलेल्या या ईव्हीएम मशीन पोलीस बंदोबस्तात व वाहनांना जीपीएस ट्रॅकर लावून सुरक्षितपणे नवी मुंबईत आणल्यानंतर या ईव्हीएम मशीनची प्रथम स्तरीय तपासणी बेलापूर येथील वारकरी भवन या ठिकाणी ईव्हीएम मशीन कार्यवाहीचे नियंत्रण अधिकारी उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड आणि समन्वय अधिकारी कार्यकारी अभियंता विद्युत प्रविण गाडे यांच्या नियंत्रणाखाली ३५ निवडणूक मास्टर ट्रेनर्स यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलेली आहे. सदर प्रथम स्तरीय तपासणी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या समक्ष करण्यात आलेली आहे.
हैद्राबाद येथील इलेक्ट्रॉनिक कमिशन ऑफ इंडिया यांच्या ३ तज्ज्ञ अभियंत्यांकडून या प्रत्येक मशीनची सखोल तपासणी करण्यात आली असून या मशीन प्रमाणित करुन घेण्यात आलेल्या आहेत. या प्रमाणित मशीनपैकी प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात १० याप्रमाणे एकूण ८० ईव्हीएम मशीन ८ विभागांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या आहेत व त्यावर सर्व विभागांचे प्रथम प्रशिक्षण सत्र पार पडले आहे. ही १५०० हून अधिक कन्ट्रोल युनिट व ३५०० हून अधिक बॅलेट युनिट असलेली मतदान यंत्रे आठही विभागांमधील निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कार्यालयाकडे मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन व त्यामध्ये अधिकच्या २० टक्के मशीन देऊन वितरीत करण्यात आलेली आहेत.
या मशीनचे निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर मतदान केंद्रनिहाय बॅलेट पेपर लावून पुनर्तपासणी करुन घेण्यात येत आहे. महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण यांच्यासह कोपरखैरणे व तुर्भे येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देऊन निवडणूक यंत्र सिलींग प्रक्रियेची पाहणी केली. या प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मास्टर ट्रेनर्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे ऐनवेळी उद्भवणा-या तांत्रिक अडचणींच्या निराकरणासाठी स्वप्निल देसाई, राजेश पाटील, प्रविण पाटील हे अभियंत्यांचे मास्टर ट्रेनर्स पथक तयार असणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागासाठी एक याप्रमाणे ईसीआयचे ८ तज्ज्ञ अभियंतेही कार्यरत असणार आहेत.
ईव्हीएम मशीनची वाहतूक, तपासणी, वर्गीकरण आणि वितरण या सर्व प्रक्रिया काटेकोरपणे नियमानुसार पार पाडण्यात आल्या आहेत. निवडणूक यंत्रणेच्या कालबध्द व काटेकोर नियोजनाद्वारे महापालिका प्रशासन निवडणूकीसाठी सज्ज असून प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता, सुरक्षा आणि तांत्रिक अचूकतेला प्राधान्य देण्यात येत आहे.
