ठाण्यात आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची तोफ धडाडणार
अनिल ठाणेकर
ठाणे: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोमवारी, १२ जानेवारीला ठाण्यात तोफ धडाडणार आहे. दोन्ही ठाकरे बंधूं एकत्र आल्यानंतर त्यांची ठाण्यात पहिलीच संयुक्त सभा होणार असल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि ठाणेकरांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणूस या महत्वाचा मुद्यावर आणि तत्वावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. दोन्ही ठाकरे बंधूं एकत्र आल्याने महाराष्टात उत्साहाचे वातावरण आहे. सध्याच्या पालिका निवडणुकीत दोघे ही  ताकदीने उतरले असून महाराष्ट्राचे प्रश्न आणि सध्याची राजकीय परिस्थिती या मुद्द्यांवर दोन्ही नेते मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील राजकीय समन्वयाच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या सभेला शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व उमेदवार हजेरी लावणार आहेत. सभेसाठी ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत. ही सभा आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवारी  १२ जानेवारी संध्याकाळी ठीक ६ वाजता ठाणे गडकरी रंगायतन समोर सभा पार पडणार आहे. ठाण्याच्या या सभेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *