नेरूळ : येथील फ्रुटवाला कल्चरल सेंटर (मराठा हॉल) येथे २८ डिसेंबर २०२५ रोजी कवयित्री डॉ. पुष्पांजली आप्पाजी कुंभार (एम.ए., एम.एड., पीएच.डी.) यांच्या पहिल्या वहिल्या ‘प्रेमांकुर’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध वक्ते अरुण म्हात्रे यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले. पुणे येथील वेदांतश्री प्रकाशन (प्रकाशक – सुनील उंब्रजकर) यांनी आकर्षक मुखपृष्ठ, रेखाचित्रे व दर्जेदार छपाई केली आहे.
प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध कवयित्री व निवेदिका सौ. साधना जोशी उपस्थित होत्या. प्रकाशनानंतर बोलताना अरुण म्हात्रे यांनी ‘प्रेमांकुर’ हा निसर्गप्रेम व प्रेमभावनेचा सुगंधी काव्यगजरा असल्याचे सांगितले. सौ. साधना जोशी यांनी कवितांचे अभ्यासपूर्ण रसग्रहण केले. वेदांतश्रीचे प्रकाशक सुनील उंब्रजकर यांनी ‘प्रेमांकुर’ हे त्यांच्या प्रकाशनाचे २२६ वे पुस्तक असल्याचे नमूद केले. कार्यक्रमात डॉ. पुष्पांजली कुंभार यांनी आपल्या कवितांची पार्श्वभूमी उलगडून काव्यसंग्रह प्रेमाकडे कसा वळतो याचे विश्लेषण केले. कार्यक्रमाची सुरुवात माधवी सूर्यवंशी यांच्या स्वागतगीताने झाली, तर निर्मला भागवत यांनी आभार मानले. शेवटी सामुदायिक पसायदान झाले. यावेळी काव्यसंग्रहाची पुष्पवृष्टी करत दिंडी काढण्यात आली.
कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उद्योगपती नितीन भागवत, ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता एस.के.सुरवसे सपत्नीक, पोलिस अधिकारी गंगाधर देवडे सपत्नीक, कवी विलास कुंभार, निवेदक नारायण एखतपूरकर, अशोक महाराज गोरे, डॉ. राजाळे सपत्नीक, साहित्यिका अनुसया कुंभार, बिल्डर हर्षद ठुमर सपत्नीक, भारती शिंदे व इंदू वार्ष्ण्येय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्रीचे पती डॉ. ए. टी. कुंभार (निवृत्त आयएएस) यांनी केले.
०००००
