मुंबई : बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीची सुनावणी बुधवारी होणार आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
या याचिकेच्या माध्यमातून जे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत त्यांच्यावर स्थगिती देण्यात यावी आणि जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत स्थगिती कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मनसेचे म्हणणे मान्य केलं, तर सर्व बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडीवर स्थगिती येऊ शकते. दरम्यान, मनसेकडून दुबार मतदारांची यादी फोटोसहीत तयार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. त्यामुळे मतदानाला असे मतदार आल्यानंतर त्यांची मनसेकडून चांगल्या प्रकारे स्वागत केलं जाईल, असा इशारा देखील अविनाश जाधव यांनी दिला.
निवडणुका बिनविरोध जिंकण्यात भाजपने आघाडी घेतली असून आतापर्यंत पक्षाचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्याखालोखाल शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक मिळवला असून त्यांचे २२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे सर्वाधिक १५ तर शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे २ उमेदवार, तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा १ आणि एका अपक्ष उमेदवाराचाही बिनविरोध विजय झाला आहे.
