तत्वशून्यतेची परीसीमा!
राजकारण हा घृणास्पद प्रकार असून हा बदमाशांचाच खेळ असतो अशी एक म्हण इंग्रजीत वापरली जाते. पॉलिटिक्स इज गेम ऑफ स्कौंड्रल्स! शुद्ध मराठी भाषेत ‘पाजी’. भाजपाचे प्रांताध्यक्ष रविन्द्र चव्हाण व मुख्यमंत्री तसचे भाजपाचे देशस्तरावरचे महत्वाचे नेते देवेन्द्र फडणवीस यांच्याही राजकारणावर अकोट-अंबरनाथसारख्या तत्वशून्यतेने चिखल ओतला आहे. फक्त विकासाच्या बाता नव्हे, तर पक्षफोडीची नवी तंत्रे व मंत्रेही फडणवीसांचा भाजपा दाखवतो असे खेदाने म्हणावे लागेल! खरेतर स्थानिक निवडणुकीतही भारतीय जनता पक्ष हाच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरणार हे सांगण्यासाठी कोणत्याच ज्योतिषाची गरज नव्हती. या आधी झालेल्या २०१७ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही, राज्यात भाजपाच मोठा पक्ष ठरला होता. गेल्या चाळीस वर्षात कोणत्याही पक्षाला महाराष्ट्रात जे जमले नाही ते भाजपाने करून दाखवले. पण आपलाच पक्ष राज्यातील सर्वच लहान मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तारूढ राहावा अशी जर कोणाची इच्छा असेल तर ती नैसर्गिक नक्कीच म्हणता येणार नाही. याला राक्षसी महत्वाकांक्षा असेच म्हणावे लागेल. २९ मनपांच्या निवडणुका सुरु होण्यापूर्वी राज्यातील २८४ नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. त्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका या थेट मतदारांमधून झाल्या. छोट्या मोठ्या शहरातील मतदार नागरिकांनी त्यावेळी दोन दोन मते टाकली. एक नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी आणि दुसरे आपापल्या विभागातील नगरसेवकासाठी. सतरापासून ते सत्तर नगरसेवकांच्या या गावांमध्ये भाजपाने ११७ ठिकाणी स्वतःच्या चिन्हावर नगराध्यक्षपदे जिंकली. यातील बहुसंख्य ठिकाणी महायुती वा महाआघाडी अस्तित्वात नव्हती. स्थानिक आघाड्यांवरच भर राहिला. २१ डिसेंबरला सर्व २८८ नगरपालिकांचे निकाल लागले. तोवर महानगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली होती. अर्ज भरले जात होते. सहाजिकच या निकालांचा थेट व लगेच परिणाम मनपातील तिकिटोच्छुकांवर झाला. त्यातून विचित्र प्रकार घडले. मतदानाची वेळ ठेपल्यावर सोलापुरातील एका राष्ट्रवादी उमेदवाराने भाजपात प्रवेश केला! तिकीट कॉँग्रेसचे घ्यायचे नंतर ते नाकारून कमळ हाती घ्यायचे असेही प्रकार काही ठिकाणी घडले. पण ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगरपालिकेचे उदाहरण “पाजी”पणाचा कळस होता. इथे २० डिसेंबरला मतदान झाले व निकाल लगेच दुसऱ्या दिवशी आले. त्यात भाजपाच्या सीए तेजश्री करंजुले पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मनिषा वालेकरांचा पराभव तब्बल सहा हजार मतांनी केला. नगरसेवक व नगराध्यक्षपदासाठी मतदान एकाच वेळी झाले खरे पण अंबरनाथकरांनी नगरसेवकपदांसाठी मात्र शिंदेंच्या शिवसेनेला कौल दिला तर नगराध्यक्षपद भाजपाला दिले. नगराध्यक्ष भाजपाचा बसला पण सभागृहात शिवेसनेकडे बहुमत अशी स्थिती आली. काँग्रसचे १२ नगरसेवक विजयी झाले तर भाजपाची संख्या १४ इतकीच राहिली. राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचे चार व दोन अपक्ष आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी जे मतदान निवडून आलेल्या नगरसेवकांमधून व्हायचे होते. पण उपनगराध्यक्ष भाजपाचाच व्हावा अशी नेत्यांची तीव्र इच्छा होती. खरेतर शिवसेना मित्रपक्ष. राज्यात सत्तेत एकत्र. मुंबई मनपा व ठाणे मनपातही दोघे एकत्र लढताहेत. पण अंबरनाथमध्ये मात्र सेनेचा साध्या उपनगराध्यक्ष पदाचाही हक्क भाजपाला हिसकावून घ्यावासा वाटला, हेच तर अति महत्वाकांक्षेचे लक्षण! ठाणे जिल्ह्याला लागूनच असणाऱ्या डोंबिवलीचे आमदार रविन्द्र चव्हाण हेच भाजपाचे प्रांताध्यक्ष. त्यांच्या जिल्ह्यातील एका नगरपालिकेत अभूतपूर्व अशी काँग्रेस बरोबर भाजपाची आघाडी घडवली गेली. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या हातातून उपनगराध्यक्ष पद हिसकावण्याचा घाट घातला होता. या काँग्रेस भाजपा युतीने अपक्षांसह राष्ट्रवादीचे समर्थन मिळवले आणि साठ सदस्यांच्या सभागृहात 3२ नगरसेवक भाजपाने आपल्या मागे उभे केले. राष्ट्रवादी अजितदादा व अपक्षांचे बळ मिळवून शिंदेंना शह देण्याचा हा चंग होता. पण पक्षश्रेष्ठींनी डोळे वटारले. काँग्रसेचे प्रातांध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे दोघे रागावल्याच्या बातम्या आल्या. मग ती युती फिस्कटली. पण त्याच रात्री अंबरनाथ नगर पालिकेतील काँग्रेसचे निवडून आलेले अकरा नगरसेवक हे भाजपात सामील झाले. आता कमळ चिन्हावरील नगरसेवकांची संख्या झाली २५. आणि त्यांना रा.काँ. व अपक्षांचे पाठबळ होतेच त्यामुळे उपाध्यक्ष भाजपा म्हणेल तोच होणार हे वातावरण झाले. पण चोरावर मोर या न्यायाने खा. श्रीकांत शिंदे यांनीही प्यादी हलवली आणि रा. काँ. व अपक्षांनी शिंदे सेनेची साथ देऊन टाकली. उपनगराध्यक्षपद शिंदेंकडेच आले. ज्या जिल्ह्याचे चव्हाण आहेत, त्याच जिल्ह्याचे नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. आनंद दिघेंचे ते वारसदार आहेत. यात झाले काय, भाजपाचे कमळ हातात घेणारे काँग्रेसच्या हात चिन्हावर निवडून आलेले ११ नगसवेक हात चोळत बसले. अंबरनाथच्या शेजारच्याच बदलापूर नगरपालिकेतही असा घाणेरडा गेम भाजपाने खेळला. पन्नास नगरसेवकांच्या या पालिकेत भाजपाकडे नगराध्यक्षपद हे व तेवीस नगरसेवकही आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने भाजपाच्या विरोधात लढताना २३ नगरसेवक मिळवले. तीन राष्ट्रवादीचे आहेत. यात भाजपा व रा. काँ. अजितदादा अशी युती विरुद्ध शिंदे अशी लढत होती. पाच नगरसेवक स्वीकृत करायचे होते. भाजपा दोन, शिंदे दोन व अजितदादा एक असे नगरसेवक स्वीकृत झाले. त्यात कुळगाव बदलापूर मधील गाजलेल्या बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल केली नाही, असा आरोप असणारे शाळेचे सचीव तुषार आपटे, यांना भाजपाने स्वीकृत करून आणखी एकदा स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. लहान मुलींवरच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी शाळेच्या शिपायाला मुळात नियुक्त करतानाच काळजी घेतली नाही, हाही आरोप आपटेवर आहे. तो आरोपी संशयास्पद एन्कौंटरमध्ये मारला गेल्याने यातील संशयाचेही मोहोळ भाजपा सरकार विरोधात घोंघावतेच आहे. अशात आपटेला स्वीकृत करण्याचा निर्णय प्रांताध्यक्ष चव्हाणांनी का बरे घेतला असेल? तिकडे मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातील अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेचे प्रकरण आणखीनच गहन आहे. तिथे सत्तास्थापनेसाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी चक्क एमआयएमला सोबत घेतले. म्हणे, अकोट विकास आघाडीत सर्वपक्षीय आहेत ! मुख्यमंत्र्यांच्या घरच्या अंगणातील या प्रकाराचा दोष व रोष देशभरात उमटल्यास नवल नव्हतेच. तसाच ताप फडणवीसांना अकोट प्रकरणात झाला. आता ती आघाडी घडवणाऱे स्थानिक आमदार प्रकाश भारसाखळेंना पक्षाने नोटीस वगैरे बजावली आहे. पण मुळात, “कटेंगे बटेंगेचे” लक्ष्य असणाऱ्या पक्षाबरोबर भाजपा बसूच कसा शकतो ? असा प्रश्न भाजपाच्या मतदारांना पडला आहे. तत्व वगैरे कुठल्या खुंटीला टांगायचे ठरवले आहे का ? भाजपाला सत्तेसाठी एमआयएमची मदत घ्यावीशी वाटणे ही तर तत्वशून्यतेची परिसीमा झाली!! जनतेते तुमची प्रतिमा पुरती मलीन करण्यासाठी एक अकोटही पुरेसे होते. त्यात भाजपाने अंबरनाथ गळ्यात घेतले याला काय म्हणावे? अंबरनाथ भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त करू अशा घोषणेवर फडणवीसांनी ही निवडणूक लढवली व नगराध्यक्षपद जिंकले. पण उपनगराध्यक्षपदाचा जो खेळ केला त्यातून या घोषणेचेचे बारा वाजले आहेत असेच म्हणावे लागेल!!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *