हिंदुत्वातून जातकारणाकडे…
बऱ्याच काळापासून उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये ब्राह्मण मतदारांनी भाजपवर दृढ विश्वास ठेवला आहे. या निवडणुकांमधील आकडेवारीनुसार भाजपला 72 ते 82 टक्के ब्राह्मण मते मिळाली आहेत. म्हणूनच भाजपसाठी ब्राह्मण मतपेढी धोरणात्मकदृष््या महत्त्वाची आहे, यात शंका नाही. विशेषतः ब्राह्मण लोकसंख्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये ही मतपेढी अत्यंत महत्त्वाची बनते. मात्र अलिकडच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष असणारा समाजवादी पक्ष आता ब्राह्मण समुदायाला आकर्षित करत असून हा वर्ग 2027 च्या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे. हे लक्षात घेता उत्तर प्रदेश विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान 40 पेक्षा अधिक ब्राह्मण आमदार भोजन समारंभाला एकत्र उपस्थित राहिल्याच्या घटनेला राजकीय रंग येणे स्वाभाविक म्हणावे लागेल. या कार्यक्रमाला योगी सरकारमधील ब्राह्मण आमदारांचे शक्तीप्रदर्शन असेही म्हटले जात आहे. हितसंबंध जपले जात नसल्याबद्दल हे आमदार संतप्त आहेत. त्यामुळे ते सर्वजण आणि विधान परिषदेचे सदस्य लखनऊ येथील आमदार पी. एन. पाठक यांच्या निवासस्थानी भोजन कार्यक्रमाला जमले होते. उपमुख्यमंत्री आणि यजमान पाठक स्वतः या बैठकीचे वर्णन ‌‘अनौपचारिक बैठक‌’ असे करत असले तरी त्याबद्दल विविध राजकीय अटकळी बांधल्या जात आहेत.
हा ब्राह्मण आमदारांमधील वाढत्या असंतोषाचा परिणाम असल्याचे सांगत विरोधकांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. विरोधकांनी म्हटले आहे की, या सर्व आमदारांना अपमानित आणि असहाय्य वाटल्यामुळेच भविष्य आखण्यासाठी एकत्र येणे भाग पडले. एकंदरीत, हे प्रकरण वाढताना पाहून उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना स्वतः स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे यावे लागले. ते म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात हे सर्व आमदार उपस्थित होते. विधानसभेच्या अधिवेशनासाठी आमदार येतात, तेव्हा एकमेकांना मैत्रीपूर्ण पद्धतीने भेटतात. त्यामुळे याकडे फक्त ब्राह्मण कवा इतर कोणत्याही समुदायाच्यावा जातीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये. आमदार पी. एन. पाठक यांनीही मौर्य यांच्या विधानाचे समर्थन केले. ते म्हणाले की, हे एक साधे सामुदायिक जेवण होते. सर्व आमदारांना लिट्टी चोखा खाण्यासाठी आमंत्रित केले होते. तथापि, फक्त ब्राह्मण आमदारांना आमंत्रित का केले होते, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही. या भेटीमध्ये आमदारांनी प्रामुख्याने आपापल्या मतदारसंघात सुरू असणाऱ्या विकासकामांवर चर्चा केल्याचे स्पष्ट करत सर्वजण राज्य सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले. मात्र रात्रीच्या जेवणादरम्यान चर्चेचे मुख्य विषय ब्राह्मण समुदायाविरुद्ध कथित भेदभाव आणि दुर्लक्ष हादेखील होता. त्यामुळेच सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर भर दिला.
बैठकीप्रसंगी एका आमदाराने सध्या ब्राह्मण समाजातील सदस्यांचा अपमान केला जात असल्याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली. आपल्या समुदायाने भारताच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मात्र ते नाकारले जात असल्याचे सांगितले. अर्थात हा बैठकीतील राजकीय मुद्दा बनवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र भाजप नेत्यांकडून अनेक स्पष्टीकरणे देऊनही विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे. त्यांनी असा दावा केला की, सत्ताधारी पक्षात सर्व काही ठीक नाही. खेरीज भाजपचे वरिष्ठ नेते या बहुचर्चित बैठकीवर भाष्य करण्याचे टाळत आहेत. परिणामी, उत्तर प्रदेशच्या राजकारणातील वाढत्या राजकीय तापमानामुळे काही तरी अनुचित घडण्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत सत्ताधारी भाजपसह सर्व राजकीय पक्षांचे ब्राह्मण आमदार सहभागी होते. आमदार पाठक यांच्या पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे सर्व आमदार एकत्र आले होते. तथापि, राजकीय वर्तुळात वाढदिवस साजरा करणे हे केवळ एक निमित्त असल्याचे बोलले जात आहे.
ब्राह्मण आमदारांनी यामागे स्पष्ट रणनीती आखली आहे. तिचा थेट संबंध 2027 च्या विधानसभा निवडणुकीशी आहे. यामुळे ब्राह्मण आमदारांचे जणू एक कुटुंबच तयार झाले आहे. सध्या उत्तर प्रदेश विधानसभेत 52 ब्राह्मण आमदार असून त्यापैकी 46 भाजपचे आहेत. स्वाभाविकच ब्राह्मण आमदारांच्या या बैठकीमुळे राज्य सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोरचे आव्हान वाढले आहे. आता भविष्यात काय होते ते पहावे लागेल. ब्राह्मण आमदारांच्या बैठकीनंतर श्री. पाठक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चा आणखी वाढली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वीही ठाकूर आणि इतर समुदायांच्या आमदारांसोबत अशा अनौपचारिक बैठका झाल्या आहेत. मोदी यांनी लखनऊमध्ये येऊन राष्ट्रीय प्रेरणा स्थळाचे उद्घाटनही केले आहे. श्री. पाठकदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते अनपेक्षितपणे दिल्लीत गेले आणि पंतप्रधान मोदींची भेट घेतली. वाराणसीचे महापौर अशोक तिवारीदेखील या बैठकीला उपस्थित होते. आता या भेटीचे वर्णन ‌‘सौजन्य भेट‌’ म्हणून केले जात आहे. मात्र प्रत्यक्षात पाठक यांनी या भेटीत समुदायाच्या भावना कवा यासंबंधीचे अन्य मुद्दे पंतप्रधानांना कळवले असावेत, असा अंदाज बांधला जात होता. पाठक हे स्वतः ब्राह्मण समाजातील एक वजनदार नेते असून भाजपमध्ये त्यांचे स्थान सातत्याने वाढत आहे. अलिकडेच भाजपने नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले आहेत. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चाही चर्चा जोरात आहे. अशा परिस्थितीत, ही बैठक पक्षाच्या रणनीतीचा एक भाग मानली जात आहे. काही विश्लेषकांचा विश्वास आहे की, 2027 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण समुदाय एक मजबूत संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. या बैठकीचे राजकीय परिणाम येणारा काळच सांगेल; परंतु यामुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय गोंधळ निश्चितच तीव्र झाला आहे. मायावती यांच्या ‌‘सोशल इंजिनिअरिग‌’च्या प्रयत्नांनंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात ब्राह्मण मतदार महत्वपूर्ण झाले असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांना त्यांच्याशी संवाद साधणे भाग पडत आहे. स्वातंत्र्यापासून 1989 पर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झालेल्यांपैकी सहा ब्राह्मण होते, हेदेखील इथे लक्षात ठेवावे लागेल. ते सर्व काँग्रेस पक्षाचे होते.
(अद्वैत फीचर्स)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *