काहींच्या पोटातली हातभट्टी…

आपल्या सर्वांच्या शरीरात पोट हा भाग किती महत्वाचा असतो हे वेगळे सांगायला नको. या पोटात प्रत्यक्ष अग्नीचा निवास असतो आणि तोच आपण खाल्लेले अन्न पचवून त्याची आवश्यक ती पौष्टिक तत्वे आपल्या शरीराला मिळवून देत असतो. यालाच जठराग्नी अथवा ‘पोटाची आग’ असेही नाव दिले जाते. ही आग केवळ आहाराच शांत करू शकतो असेही मानले गेले आहे.
सर्वसाधारणपणे असेच असले तरीही आपल्या पोटातले काही कीटाणू शरीराला मदत करणारे असतात तर काही आपल्या आहारातील पदार्थांचे रूपांतर चक्क मद्य अथवा दारूत करतात. सर्वांच्या शरीरात असे होत नाही परंतु काही लोकांच्या आहारात पिझ्झासारखे काही पदार्थ आले तर त्यांना मद्यपान केल्याचा अनुभव येतो असे दिसले आहे. या प्रकाराला ऑटो-ब्र्यूवरी सिंड्रोम असे नाव आहे, शरीरातील आतड्याची जणू हातभट्टी करण्याचा हा प्रकार असतो. दारूचा घोटही घेतला नसला तरी अशा लोकांना दारू पिण्याचा अनुभव येतो. आपल्या बऱ्याच ओळखीचे असे ई-कोली आणि के-न्युमोनिए कीटाणू या प्रकाराला कारणीभूत असतात.
आपल्या आहारातील तांदळासारखी धान्ये, बटाटे, मका, काही फळे, दूध,. दही तसेच सोडा, आईस्क्रीम, केक आणि बिस्किटे यात असलेले कार्बोहायड्रेट म्हणजे कर्बोदके याला कारणीभूत असतात. चिप्स आणि त्यासारखे पदार्थ देखील यात असतात. हे पदार्थ शरीराला आवश्यक असतातच परंतु काही लोकांच्या पोटातील विशिष्ट कीटाणू त्यावर प्रक्रिया करून त्यांचे रूपांतर ‘इथेनॉल’ मध्ये करतात. असा हा ऑटो-ब्र्यूवरी सिंड्रोम दुर्मिळ प्रकार असला तरी त्यापासून स्वत:चे रक्षण करणे आवश्यक असते कारण यापासूनच यकृत म्हणजे पित्ताशयातील वाढलेल्या चरबीचे रोग निर्माण होतात.
योग्य वेळ आणि प्रमाण असेल तर मद्याचा आनद घेता येतो असे मानले जाते परंतु काहीही कल्पना नसताना आणि ताजा आणलेला पिझ्झा अथवा सँडविच घरीच खात असताना त्याला जर ‘झिंग’ आली असेल आणि प्रत्येक वेळी किंवा अनेकदा हे पदार्थ खाल्ल्यानंतर असाच प्रकार दिसत असेल तर ही काळजीची बाब आहे असे समजायला हवे. अशा लोकांच्या बाबतीत जे संशोधन सुरु आहे त्यात यासाठी जबाबदार असलेले कीटाणू आणि त्यांची ‘इथेनॉल’ निर्मिती प्रक्रिया यांचा अभ्यास केला गेला आहे. हेच पदार्थ आहारात असणाऱ्या घरातील इतर लोकांच्या मानाने या व्यक्तीचे इथेनॉल प्रमाण तिपटीने दिसले.
“नैसर्गिक सूक्ष्मजीवविज्ञान” या नियतकांलिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात मान्य करण्यात आलेली एक गोष्ट अशी की यापैकी काही लोकांबद्दल तर हे ‘छुपे’ मद्यपी आहेत असा समज केला जात असे ही गंभीर गोष्ट होती. ऑटो-ब्र्यूवरी सिंड्रोम हा प्रकार दुर्मिळ असला तरी तो वैद्यकीय ग्रंथात समाविष्ट केला गेला आहे. परंतु अशा लोकांच्या बाबतीत त्यांची एकाग्रता कमी होणे अथवा इतर शारीरिक मानसिक तक्रारीबद्दल आवश्यक तो भर देऊन विचार केला गेला नव्हता. सध्याचे संशोधन आणि अभ्यास हा या दृष्टीने सर्वात मोठा आहे.
अशा रुग्णांसाठी दिलासा देणारी गोष्ट अशी की ही बाब खरी आणि नैसर्गिक आहे आणि ती अजून पूर्णपणे समजली नसली तरी तिच्यावर यशस्वी उपचारांची पूर्ण शक्यता दृष्टिपथात आहे…
प्रसन्न फीचर्स

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *