‘माझी भाषा, माझी शाळा’ कार्यक्रमातून शाळा आणि पालकांची जबाबदारी होणार अधोरेखित
साने गुरुजी जयंती आणि मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठी अभ्यास केंद्र आणि साने गुरुजी बालविकास मंदिर यांचा पुढाकार
मुंबई: मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठी माणसाच्या भवितव्याशी थेट जोडलेले प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आणणारा ‘माझी भाषा, माझी शाळा’ हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, मराठी अभ्यास केंद्र आणि साने गुरुजी बालविकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. पूज्य साने गुरुजी यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त आणि मराठी भाषा पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर होणारा हा कार्यक्रम गुरुवार, २२ जानेवारीला सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून ‘मराठी शाळांपुढील प्रश्न आणि शाळा व पालकांची जबाबदारी’ या विषयावर ते आपले विचार मांडतील. तसेच, मराठी माध्यमाच्या शाळा टिकवणे, त्यांचा दर्जा उंचावणे आणि पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत घेतलेली भूमिका मांडतील. मराठी शाळांच्या संदर्भात सुरू असलेल्या सामाजिक व शैक्षणिक चर्चेला दिशा देणारा हा विचारमंथनाचा कार्यक्रम ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. भालचंद्र मुणगेकर (ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ) भूषविणार असून चिन्मयी सुमीत (ज्येष्ठ अभिनेत्री आणि मराठी शाळांच्या सदिच्छा दूत) यांचा विशेष सहभाग राहणार आहे. त्या ‘मराठी शाळांचे महत्त्व’ या विषयावर मुलांशी संवाद साधणार असून साने गुरुजींच्या लेखनातील एका उताऱ्याचे अभिवाचन करणार आहेत.
कार्यक्रमात विज्ञान, गणित, इंग्रजी, भाषा, समाजशास्त्र आणि ओरिगामी या विषयांचे तज्ज्ञ मुलांना हे विषय आनंददायी आणि परिणामकारक पद्धतीने कसे शिकता येतील, याबाबत प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करणार आहेत. मराठी माध्यमातील शिक्षण आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि उपयुक्त ठरू शकते, हा विश्वास या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात ‘बालविकास मंदिर’ मासिकाच्या ‘पूज्य साने गुरुजी जयंती विशेषांक’चे प्रकाशनही करण्यात येणार आहे. मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, पालक, मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी वैचारिक पातळीवर भक्कम भूमिका मांडणाऱ्या मराठी अभ्यास केंद्राच्या या उपक्रमामुळे मराठी शिक्षण चळवळीला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास रविंद्र गावडे, दीपक पवार आणि यशवंत क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संपर्क: सुशील शेजुळे- ९६०४५२३६६६ आणि अण्णासाहेब चवरे- ९८६००९००९४
