मुंबई : मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-कसारा मध्य रेल्वे मार्ग, समृद्धी महामार्ग, शहापूर-मुरबाड-नगर अशा मार्गाचे जाळे शहापूर तालुक्यात आहे. येथील म्हामार्गावर वारंवार भीषण अपघात नेहमीच घडतात. त्यात अनेकांना तत्काळ उपचार न मिळाल्याने प्राणही गमवावे लागले आहेत; परंतु शहापूर तालुक्यात अपघातग्रस्तांवर तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी ट्रॉमा केअर सेंटर उपलब्ध नाही. तसेच ट्रॉमा केअर सेंटर सुरू व्हावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर कोणतेच प्रयत्न होत नसल्याने नागरिक संताप करीत आहेत.
समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर जखमींवर तत्काळ उपचार करण्यासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो; परंतु येथे उपचारास मर्यादा आहेत. त्यामुळे अत्याधुनिक उपचारांसाठी अपघातग्रस्तांना ठाणे, कल्याण व मुंबई यांसारख्या शहरातील रुग्णालयात न्यावे लागते. मागील वर्षी समृद्धी मार्गावर अपघातात २० च्या आसपास मजुरांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृतदेह ठेवण्यासाठी कक्ष नसल्याने ते मृतदेह उघड्यावर ठेवले होते.
रस्ते अपघात झाल्यास जखमींना प्रथम शहापूर उपजिल्हा रुग्णालय आणि तेथून ठाणे-मुंबईतील रुग्णालयांत दाखल करावे लागते. त्यामुळे अपघातग्रस्तांवर वेळेत उपचार व्हावेत, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना व स्थानिक लोकप्रतिनिधींमार्फत शहापूर तालुक्यात ट्रॉमा केअर सेंटरची मागणी होत आहे; मात्र प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडून मागणी होत नसल्याने ट्रामा केअर सेंटर सुरू झालेले नाही. खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण झाले असून येथील पहिल्या मजल्यावर ट्रामा केअर सेंटर तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
पाच एकर जागा मंजूर
ग्रामीण रुग्णालय हे खर्डी रेल्वेस्थानक व मुंबई-आग्रा महामार्गालगतच मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे येथे जखमींना तत्काळ उपचार मिळून अनेक अपघातग्रस्तांचे जीव वाचू शकतात; तर या रुग्णालयालगत पाच एकर जागाही ट्रामा केअर सेंटरसाठी मंजूर आहे. त्यामुळे बांधकाम होईपर्यंत खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
खर्डी येथे ट्रामा केअर सेंटर व्हावे, यासाठी मंत्रालय स्तरावर प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
– डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे