नवी मुंबई : राज्य सरकारने आरटीई प्रवेश नियमावलीत केलेल्या आमूलाग्र बदलामुळे प्रवेशप्रक्रिया करताना पालकवर्गात मोठा गोंधळ उडाला आहे. एक किलोमीटरच्या परिसरात सरकारी शाळा असल्यास इतर खासगी अथवा अनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश न देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे आरटीईच्या माध्यमातून खासगी शाळांमध्ये आपल्या मुलांना शिक्षण देण्याचे पालकांचे स्वप्न भंगले आहे. सध्या आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. नवी मुंबईत प्रत्येक प्रभागात महापालिकेच्या पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. त्यामुळे ऑनलाईन अर्ज करताना पालकांना इतर खासगी शाळांच्या जागा दिसत नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत अनुदानित खासगी, विनाअनुदानित आणि महापालिका अशा सुमारे दीड हजार शाळा आहेत. नवी मुंबई शहर हे सिडकोने नियोजन करून वसवल्यामुळे प्रत्येक प्रभागात महापालिकेची शाळा आहे. ज्या भागात महापालिकेची शाळा आहे, त्याच परिसरात इतर संस्थांच्या खासगी आणि अनुदानित शाळाही आहेत. सध्याच्या स्पर्धेच्या युगात सामान्य ते उच्चवर्गीय गटांतील प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांनी ही चांगल्या खासगी शाळेत शिक्षण घ्यावे, अशीच धारणा आहे. समाजातील प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे, तो वंचित राहू नये, याकरिता सरकारने सर्वशिक्षा अभियानांतर्गत सक्तीचे शिक्षण हे धोरण अवलंबले. याच धोरणातून आरटीईचा जन्म झाला. सरकारी शाळा अनुदानित आहेत, अशा स्वायत्त संस्थांमधून आरटीईद्वारे शिक्षण देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले होते. त्यामुळे खासगी शाळांमध्ये पालकांना शिशू वर्गापासून ते आठवीपर्यंत शिक्षण मोफत देता येत होते; मात्र आता सरकारने आरटीई धोरणात बदल केल्यामुळे आरटीईच्या पोर्टलमधून खासगी शाळांची नावे गायब झाली आहेत. ज्या भागात सरकारी अथवा महापालिकेची शाळा आहे, अशा परिसरात इंग्रजी खासगी शाळांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे आता पालकांना खासगीऐवजी सरकारी शाळांमध्ये मुलांना पाठवावे लागणार आहे.

पोर्टलहून महापालिकेच्या शाळा गायब

नवी मुंबई शहरात सीवूड्स, सारसोळे, कोपरखैरणे या ठिकाणी सीबीएसई इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळा ज्या परिसरात आहेत, त्या ठिकाणच्या पालकांना आरटीई पोर्टलवर इतर खासगी शाळा दिसत नाही; मात्र महापालिकेच्या शाळाही पोर्टलवर दिसत नसल्याने प्रवेश कसा घ्यायचा, असा नवा गोंधळ निर्माण झाला आहे.

प्रवेशासाठी महापालिकेचे नवीन पोर्टल

सीबीएसई शाळेत विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुलभ व्हावी, याकरिता महापालिकेतर्फे वेगळे पोर्टल तयार केले जात आहे. या पोर्टलद्वारे अर्ज भरून पालकांना पाल्याचा प्रवेश करता येणार आहे. हे पोर्टल अद्याप तयार न झाल्यामुळे प्रवेशप्रक्रिया थांबवली असल्याचे समजते आहे.

शाळांना मान्यता नाही

नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळांना अद्याप दिल्ली बोर्डाकडून मान्यता मिळालेली नाही. गेल्या सात वर्षांपेक्षा अधिक काळ मान्यता मिळवण्यात नवी मुंबई महापालिका अपयशी ठरली आहे. अशा परिस्थितीत आरटीई पोर्टलवर नवी मुंबईच्या शाळा मान्यता नसल्याने दिसत नाही. मात्र, एकीकडे शाळांना परवानगी आणण्याचे आणि दुसरीकडे प्रवेशप्रक्रियेकरिता पोर्टल तयार करण्याचे दोन्ही समांतर काम सुरू असल्याचे समजले.

महापालिकेच्या सीबीएसईच्या शाळांना मान्यता घेणे आणि प्रवेशप्रक्रिया राबवणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शहरातील पालकांकरिता स्वतंत्र प्रवेशप्रक्रिया राबवण्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र पोर्टल तयार करण्याचे काम वेगवेगळ्या पातळीवर सुरू आहे.

– डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *