सुरत : भाजपाने यंदाच्या निवडणूकीत आपले खाते उघडले आहे. सुरतमध्य काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाने बाद ठरविल्यामुळे भाजप उमेदवार मुकेश दलाल बिनविरोध विजयी झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी त्यांना संसद सदस्यत्वाचं प्रमाणपत्र दिलं. दरम्यान भाजपाने लढाई अधिच सुरत लुटले अशी टीका विरोधकांनी केली.
नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर सूरत लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी आठ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. बहुजन समाजवादी पार्टीचे उमेदवार प्यारेलाल भारती ही निवडणूक लढवतील ही अटकळही खोटी ठरली. प्यारेलाल भारती यांनीही उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. सगळ्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळं अखेर भाजप उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं.
भाजपा उमेदवार मुकेश दलाल यांचे निवडणूक एजंट दिनेश जोधानी यांनी कुंभानी यांच्या समर्थकांवर आक्षेप गेतला होता. नीलेश कुंभानी यांचे समर्थक म्हणून सह्या करणाऱ्या चार जणांपैकी तिघांनी फॉर्मवर सह्या केल्या नसल्याची शपथपत्र निवडणूक अधिकाऱ्यांना दिले त्यामुळं ही स्थिती निर्माण झाली. रविवारी निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दोन्ही पक्षांनी युक्तिवाद सादर केले. या वादानंतर काँग्रेस उमेदवारांचे समर्थक उपस्थित राहिले नाही, त्यामुळं हा फॉर्म रद्द करण्यात आला. त्यानंतर काँग्रेसचे डमी उमेदवार सुरेश पडसाला यांचा अर्जही रद्द करण्याचा आदेश देण्यात आला. रमेशभाई बलवंतभाई पोलारा, जगदीश नागजीभाई सावलिया आणि ध्रुविन धीरुभाई धमेलिया यांनी नीलेश कुंभानी यांचे समर्थक म्हणून सह्या केल्या. जगदीश सावलिया नीलेश कुंभानी यांचे जावई तर ध्रुविन धमेलिया त्यांचे पुतणे आहेत. तसंच रमेश पोलारा त्यांचे व्यवसायातील भागिदार राहिलेले आहेत.
हे तिघेही नीलेश कुंभानी यांचे नीकटवर्तीय असल्यामुळं, त्यांनी असं का केलं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. फण या प्रकारानंतर हे सगळे संपर्कात नाहीत. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी त्यांच्या उमेदवारांच्या समर्थकांचं अपहरण करण्यात आल्याचा दावा केला आहे.
नीलेशभाईंच्या समर्थकांचं ‘अपहरण’ करण्यात आलं आहे. तसंच त्यांना गोपनीय ठिकाणी नेलं आहे. त्यांचे फोन सुरू नाहीत. कुणीतरी धमकी देऊन, दबाव निर्माण करून शपथपत्र घेतलं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नेऊन दिलं,” असा आरोप आप नेते गोपाल इटालिया यांनी केला. दरम्यान, कुंभानी यांनी उमरा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत त्यांच्या समर्थकांच्या अपहरणाचा आरोप केला आहे.

हुकूमशहाची ‘सूरत’ सामोरी आली – राहुल गांधीं

“हुकूमशहाची खरी ‘सूरत’ पुन्हा एकदा देशासमोर आली आहे. जनतेचा नेता निवडण्याचा अधिकार हिरावून घेणे हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की, ही केवळ सरकार स्थापन करण्याची निवडणूक नाही, ही निवडणूक देश वाचवण्याची, संविधानाच्या रक्षणाची निवडणूक आहे.” अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींसहीत भाजपावर टिका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *