स्वामी विवेकानंद सोसायटीतर्फे संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू व माता-पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन
हरिभाऊ लाखे
नाशिक : नाशिक येथील इंदिरानगर विभागातील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित पूर्व-प्राथमिक विद्यालयात संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू व माता-पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हिवाळ्यातील भाज्या गाजर, मटार, बोर यांचा कल्पक वापर करून तसेच बालकांचे आकर्षण ठरणाऱ्या पतंगांच्या माध्यमातून रेखीव रांगोळी व आकर्षक सौभाग्यलंकारांची सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात सर्व मातांच्या स्वागताने झाली. सुमधुर आवाजाच्या अश्विनी कुलकर्णी यांच्या गणेशस्तवनाने उपस्थित महिला मंत्रमुग्ध झाल्या.
यानंतर महिलांसाठी लाटण्यात बांगडी घालणे, संगीत खुर्ची, विनोदी उखाणे तसेच हौशी गटखेळ अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कला व कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये एकोपा, सामाजिक सलोखा, आपुलकी व सांस्कृतिक जाणीव वाढीस लागल्याचे मत मुख्याध्यापक रत्नाकर वेळीस यांनी व्यक्त केले. धमाल, मस्ती व मनोरंजनाने भरलेला हा कार्यक्रम कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
