‘मुस्कान ऑपरेशन’ अंतर्गत हरवलेल्या मतिमंद बालकाचा पालकांशी यशस्वी पुनर्मिलाप
ठाणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
अनिल ठाणेकर
ठाणे, ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेअंतर्गत कार्यरत चाइल्ड प्रोटेक्शन युनिट (CPU) यांनी “मुस्कान ऑपरेशन” दरम्यान हरवलेल्या एका मतिमंद विशेष बालकाचा यशस्वी शोध घेऊन त्यास त्याच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द केले आहे.सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव,सहायक पोलीस आयुक्त विनय घोरपडे (शोध–२) यांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली चाइल्ड प्रोटेक्शन युनिट (CPU), ठाणे येथील म.पो.उपनि. शिंदे व मपोशि ७०२२ / यादव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
१९ जानेवारी रोजी सुमारे १७ वर्षांचा मुलगा हा रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथे विना पालक आढळून आला होता. त्यानंतर त्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने बालगृहात दाखल करण्यात आले होते. ९ जानेवारी रोजी पोलीस हवालदार तानाजी गायकवाड यांनी बालगृहास भेट दिली असता सदर बालकाबाबत सविस्तर माहिती प्राप्त झाली.सदर बालक मतिमंद असल्याने तो नीट बोलू शकत नव्हता. मात्र, त्याच्याकडून मिळालेल्या मर्यादित माहितीतून – वडिलांचे नाव आलमगीर, नमाजची ओळख व मुंब्रा परिसराचा अंदाज – CPU पथकाने शोधकार्य सुरु केले. मुंब्रा व शिळ–डायघर पोलीस ठाण्यात तपास केला असता कोणतीही तक्रार नोंद नसल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर स्थानिक मशिदींचे मौलवी, धार्मिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, शाळांचे व्हॉट्सॲप गट तसेच समाजमाध्यमांच्या माध्यमातून बालकाचा फोटो व माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली. समाजमाध्यमांद्वारे प्राप्त माहितीनुसार २३ जानेवारीला बालकाची आई मोहीबोनीसा यांनी CPU, ठाणे येथे संपर्क साधला. त्यांनी आवश्यक कागदपत्रांच्या आधारे मुलाची ओळख मोहम्मद इमरान आलमगीर अशी पटवून दिली. तसेच व्हिडिओ कॉलद्वारे बालकानेही आपल्या आईस ओळखले.त्यानंतर सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून डेव्हिड ससून बालगृह, माटुंगा येथे बालकास बालकल्याण समिती (CWC), मुंबई समोर सादर करण्यात आले व समितीच्या आदेशानुसार त्यास त्याच्या पालकांच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.ठाणे पोलीस आयुक्तालय नागरिकांना आवाहन करते की, कोणतेही हरवलेले किंवा बेवारस बालक आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा किंवा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक १०९८ वर संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *