वयाच्या साठीत उभा केला मधनिर्मितीचा उद्योग
कसोटी, जिद्द आणि विश्वासाच्या जोरावर उभा राहिला एक ब्रँड
पर्यावरणाशी नाते जोडून गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी झाला उद्योग
योगेश चांदेकर
पालघरः वय, शिक्षण अनुभव याचा उद्योग उभारणीत कोणताही अडथळा येत नाही. नवे काही करण्याची तयारी आणि ग्राहकाला दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि पर्यावरणाशी नाते जोडणारे देण्याची तयारी या त्रिसूत्रीवर उद्योगाचे यश अवलंबून असते. डहाणू तालुक्यातील घोलवड येथील साठ वर्षीय विश्वास नेरुरकर यांनी नवीन उद्योग सुरू करून एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील घोलवड हे महाराष्ट्र शासनाने,घोषित केलेले महाराष्ट्रातील तिसरे मधाचे गाव असुन, याचा वसा घेऊन उद्योगात यशस्वी झेप घेऊन संकल्प हनी चा मुख्य उद्देश घेऊन स्थानिकांना, थोड्याफार रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी हा नेरूरकर यांचा प्रयत्न आहे.
निसर्गातूनच घेऊन माणसाला नैसर्गिक देण्याची जिद्द यातून ‘संकल्प हनी’चा उद्योगाचा जन्म झाला. आज या उद्योगांना शंभर नव्हे, तर १०१ टक्के गुणवत्तेची हमी दिली आहे. गुणवत्ता, दर्जा आणि नैसर्गिक हेच त्यांच्या यशाचे गणित आहे.
नोकरीऐवजी उद्योगात रमले मन
विश्वास नेरूरकर यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले. नोकरीत त्यांना रस नव्हता. विद्युत संबंधी व्यवसाय काही काळ केला; परंतु लोकांच्या आरोग्याची काळजी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. भेसळ त्यांना पाहवत नव्हती. त्यामुळे स्वतःच शंभर टक्के पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी कोणतीही तडजोड न करता त्यांनी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण डहाणू तालुक्यातील कोसबाड येथे घेऊन मधाची निर्मिती करण्याचे त्यांनी ठरवले. केवळ स्वतः पुरती मध निर्मिती न करता इतरांना सहभागी करून घेतले व संकल्प घेऊन संकल्प हनीची निर्मिती केली.
संकल्पातून ‘संकल्प हनी’
निसर्गाची साथ, मधमाशी पालनाची परंपरा यांचा सुंदर संगम घोलवडला घालण्यात आला आहे. एक संकल्प हाती घेऊन तो पूर्णत्वाला नेण्याच्या त्यांच्या जिद्दीतून ‘संकल्प हनी’ हा एक ब्रँड तयार झाला आणि तो लोकांच्या आता जिभेवर चांगलाच रेंगाळला आहे. मध हा निसर्गतः गोड असतो. आरोग्यासाठी तो लाभदायी असतो. तो निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. या ठेव्याला व्यावसायिक रूप विश्वास नेरुरकर यांनी दिले. स्वतःच्या रोजगाराची त्यांना फारशी चिंता नव्हती; परंतु आपल्या व्यवसायातून इतरांच्या हातालाही काम मिळाले पाहिजे, इतरांचे आरोग्य ही जपले पाहिजे आणि त्यातून दोन पैसे मिळतील हा हेतू समोर ठेवून विश्वासराव मधुमक्षिकापालनाकडे वळाले.
प्रामाणिकपणातून उभा राहिला व्यवसाय
मधमाशी पालन हा व्यवसाय जसा पैसा मिळवून देणारा आहे तसेच तो उत्पादकता वाढवणारा आहे. त्यांच्या संकल्पनेमध्ये जागतिक मधमाशीच्या रंगसंगतीचा वापर करण्यात आला आहे. त्यांचा व्यवसाय सातत्य, प्रामाणिकपणातून उभारला आहे. ग्राहकाला मध हे उत्कृष्ट दिले पाहिजे, यावर त्यांचा भर आहे. ‘संकल्प हनी’ चे मध पूर्णपणे नैसर्गिक आहे. त्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यात रसायने मिसळली जात नाहीत त्यामुळे मधाची शुद्धता आणि पौष्टिकता कायम राहते. मध उत्पादन हा ठराविक हंगामापुरचा मर्यादित व्यवसाय आहे.
आव्हाने अनेक, त्यावर मात
डहाणू तालुक्यातील घोलवड सारख्या दुर्गम डोंगर भागात हा व्यवसाय करताना अनेक आव्हाने समोर असतात, वीज आणि साधन सामग्रीची कमतरता असते; परंतु विश्वास आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी या संकटावर मात केली. त्यांच्या पाच जणांची टीम मधपालनात आहे; परंतु ते उत्पादित कसे करत असलेला मध बाजारपेठेत पुरत नाही. त्यामुळे त्यांनी आपल्यासारखे अनेक शेतकरी मध उत्पादनाकडे वळवले. त्यांनाही निसर्गाशी प्रामाणिक राहून मध उत्पादनात कोणतीही तडजोड करायची नाही, अशी दीक्षा त्यांनी दिली. ‘संकल्प मध’ उत्पादनाच्या बाबतीत त्यांनी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. प्रयोगशाळेत चाचण्याही झाल्या आहेत. त्यांच्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला एक प्रकारे चालना मिळाली आहे.
कोट
‘मधमाशी पालन हा व्यवसाय ठराविक काळापुरता असला, तरी त्यासाठी वर्षभरही वेगवेगळ्या स्वरूपात काम करावे लागते. मध हा निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. अनेक आजारावर तो गुणकारी आहे. नैसर्गिक मधाचे अनेक फायदे आहेत. त्यात कोणतीही रसायने न मिसळता एकशे एक टक्के नैसर्गिक तसेच उत्तम गुणवत्तेचा मध आम्ही निर्माण करून आमचा ‘हनी संकल्प’ हा ब्रँड यशस्वी करू शकलो. आता अनेक शेतकऱ्यांना आमच्या व्यवसायाशी जोडण्यावर आमचा भर आहे. त्यातून स्थानिक अर्थकारणाला गती मिळते.
विश्वास नेरुरकर, उत्पादक ‘संकल्प हनी,’ घोलवड, डहाणू
