३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी
सागर वाघमारेला प्रथम मानांकन
मुंबई: महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आयोजित भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२६ गुरुवार २९ जानेवारीला सकाळी ९ वाजता श्री हालारी विसा ओसवाल समाज वातानुकूलित हॉल, दादर येथे सुरु होत आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव श्री संजय शेटे, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव श्री निलेश भोसले, मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मयेकर तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र शाह व कार्याध्यक्ष भारत देसडला यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन करण्यात येणार असून त्यानंतर सामन्यांना सुरुवात होणार आहे. बँक ऑफ इंडिया, आय डी बी आय बँक, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या स्पर्धेचे गोल्ड प्रायोजक असून सिस्का कॅरम कंपनी साहित्य पार्टनर आहे. सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट कॅरम सोंगट्यांचा प्रथमच या स्पर्धेत वापर करण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी एकावेळी ४८ बोर्डांवरती एकंदर १० सत्रे खेळवली जाणार आहेत.
सामने वेळेवर सुरु व्हावेत यासाठी ५० बोर्ड पंच व सामना निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय स्पर्धेचा ड्रॉ व खेळाडूच्या सामन्याची माहिती हॉलमधील स्क्रीनवर दाखविण्यात येणार असल्यामुळे कमीत कमी ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याचा असोसिएशनचा प्रयत्न आहे. स्पर्धेच्या हॉलमध्ये प्रवेश देण्यासाठी पासेसची विशेष व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या दिवसासाठी मर्यादित पास वितरण करण्यात आले आहे. तर दुसऱ्या दिवशी या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. स्पर्धेचा दर्जा लक्षात घेता होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. आंतर राष्ट्रीय खेळाडूंसाठी वी आय पी भोजन कक्ष उभारण्यात आले असून स्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टरची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सहभागी खेळाडूंना गणवेश / टी शर्ट देण्यात आले आहेत. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या युट्युब चॅनेलवरून एकाच वेळी ६ सामने लाईव्ह दाखविण्यात येणार आहेत. तर प्रसन्ना संत, एस किशोर व मंदार बर्डे हे मराठी, हिंदी आणि इंग्रजीमधून सामन्याचे धावते समालोचन करणार आहेत.
मागील चॅलेंजर्स ट्रॉफी विजेत्या महाराष्ट्राच्या सागर वाघमारेला या स्पर्धेत प्रथम मानांकन देण्यात आले आहे. तर मागील स्पर्धेतील उपविजेत्या महाराष्ट्राच्या महम्मद घुफ्रानला दुसरे मानांकन देण्यात आले आहे. महिला आणि पुरुष एकत्रित खेळत असल्याने महिला पुरुषांना कशाप्रकारे आव्हान देणार हि उत्सुकता आहे. यासाठी प्रत्येक सामना जिंकणाऱ्या महिलेला विशेष रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढील प्रमाणे.
खुली एकेरी : १) सागर वाघमारे ( महाराष्ट्र ), २) महम्मद घुफ्रान ( महाराष्ट्र ), 3) झेद अहमद ( महाराष्ट्र ), 4) रहिम खान ( महाराष्ट्र ), ५) शाहिद हिलमी ( श्रीलंका ), ६) अभिषेक भारती ( महाराष्ट्र ), ७) संदीप देवरुखकर ( महाराष्ट्र ), ८) संजय मांडे ( महाराष्ट्र )
