प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा
मुंबई : प्रतिष्ठेच्या प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धेत अमोघ शर्माने टायब्रेकवर विजेतेपद पटकावले. १६ वर्षांखालील आयोजित या बुद्धिबळ स्पर्धेत चार खेळाडूंचे समसमान गुण झाले होते. अखेर अमोघ शर्माला टायब्रेकवर विजेता घोषित करण्यात आले.
प्रतिक्षानगर येथे आयोजित या बुद्धिबळ स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. अत्यंत अटीतटीच्या लढतीत शेवटच्या पाचव्या राऊंडपर्यंत स्पर्धा चुरशीची झाली. चौथ्या फेरीत गतविजेत्या समर चव्हाणकडे चार गुणांसह प्रतिस्पर्धी खेळाडूंपेक्षा एका गुणाची आघाडी होती. परंतु त्याला पाचव्या फेरीत युवान तावडेकडून धोकादायकरित्या पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे पाचव्या फेरीअखेर समर चव्हाण, अमोघ शर्मा, अमोघ येल्लुरकर आणि युवान तावडे यांचे प्रत्येकी चार गुण झाले. अखेर सरस गुणगतीच्या आधारे अमोघ शर्माला विजेता घोषित करण्यात आले. तर गतविजेत्या समर चव्हाणला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
विशेष म्हणजे गेल्यावर्षीही टायब्रेकवरच समर चव्हाणने विजेतेपद पटकावले होते, तर अमोघ शर्माला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अमोघ येल्लुरकर तृतीय, तर युवान तावडेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
विजेत्या अमोघ शर्माला कै. सदानंद चव्हाण यांच्या स्मरणार्थ अडीच हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तर उपविजेत्या समर चव्हाणला कै. नंदकुमार जांभेकर यांच्या स्मरणार्थ दीड हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तृतीय क्रमांकावरील अमोघ येल्लुरकर याला कै. सुमित्रा राजाराम पराडे यांच्या स्मरणार्थ एक हजार रुपये, चषक आणि प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ बुद्धिबळ प्रशिक्षक राजन पिंगळे आणि निशांत येल्लुरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
PHOTO CAPTION :
प्रेस एन्क्लेव्ह बुद्धिबळ स्पर्धा विजेते खेळाडू — डावीकडून उपविजेता समर चव्हाण, विजेता अमोघ शर्मा आणि तृतीय क्रमांक विजेता अमोघ येल्लुरकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *