ठाण्याला ३ फेब्रुवारीला महापौर मिळणार
सिद्धेश शिगवण
ठाणे : ठाण्याला येत्या ३ फेब्रुवारीला महापौर मिळणार आहे. ठाणए महापौर पदासाठी येत्य ३० जानेवारीला अर्ज दाखल केले जाणार आहेत. तर, ३ फेब्रुवारी रोजी महापौर पदासाठी निवडणूक होणार असून त्यातून महापौर निवडला जाणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाण्यात एकहाती बहुमत मिळविल्यामुळे महापौर त्यांचाच होणार हे नक्की आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून महापौरपदासाठी ७ शर्यतीत आहे.
ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ७५ जागांवर यश मिळाले आहे. तसेच अपक्ष नगरेसविका प्रमिला केणी यांनी देखील त्यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे ही संख्या आता ७६ झाली आहे. मागील आठवड्यात महापौर पदासाठी आरक्षण जाहीर झाले. यामध्ये अनुसूचित जाती प्रवगार्साठी आरक्षित झालेल्या या पदासाठी शिवसेना शिंदे गटातून सात जणांची नावे पुढे आली आहेत. त्यामध्ये प्रभाग ३ (अ) महिला – पद्मा भगत, प्रभाग ६ (अ) वनिता घोगरे, प्रभाग ७ (अ) विमल भोईर, प्रभाग ९ (अ) – गणेश कांबळे, प्रभाग १६ (अ) – डॉ. दर्शना जानकर, प्रभाग २४ (अ) आरती गायकवाड आणि प्रभाग २८ (अ) दीपक जाधव यांचा समावेश आहे. त्यामुळे या सात जणांपैकी कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून महापौर पदासाठी सात जणांची नावे पुढे आली आहेत. परंतू, आता उपमहापौर पदासाठी कोणाला संधी मिळणार हे देखील पाहणे तितकेच महत्वाचे आहे. त्यातही भाजपने महापौर पदासाठी दावा केला असला तरी देखील, युती असल्याने त्यांना उपमहापौर पदावर समाधान मानावे लागणार का? अशी चर्चा रंगली असून यासंदर्भातील निर्णय येत्या दोन दिवसात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
