
दादा गेले
विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू
अपघातात ५ जणांचा मृत्यू
० महाराष्ट्रावर शोककळा
बारामती : अवघ्या महाराष्ट्राचे धडाडीचे नेते… लाडक्या बहीणींचा लाडका दादा… महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्देवी मुत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की त्यात ६६ वर्षीय अजित पवारांसह पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या उमद्या नेत्याचा असा करून अंत झाल्याने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. उद्या सकाळी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशभरातील अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार बुधवारी पहाटे मुंबईहून बारामतीला एका खासगी विमानाने प्रवास करत होते. हे विमान VT-SSK नोंदणी क्रमांक असलेले बॉम्बार्डियर लिअरजेट ४५ मॉडेलचे होते. अजित पवार यांच्यासह त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव, फ्लाईट असिस्टंट पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक अपघातात मृत्यूमुखी पडले.
-
विमान धावपट्टीवरून घसरुन अपघात अजित पवार बारामतीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी चार सभा घेणार होते. त्यासाठी ते सकाळी मुंबईहून निघाले. महाराष्ट्र विमान वाहतूक विभागाच्या म्हणण्यानुसार, वैमानिकाने बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न केला, परंतु धावपट्टी स्पष्ट दिसत नसल्याने पायलटने विमान अधिक उंचीवर नेले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर, बारामतीच्या धावपट्टीवर उतरण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान, विमान धावपट्टीवरून घसरले आणि अपघात झाला आणि त्यात आग लागली. अपघातानंतर विमानाचे अक्षरश: तुकडे झाले होते. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून सांत्वन केले. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार प्रियंका गांधी यांच्यासह देशातील नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.
घड्याळावरून ओळख पटली
अजित पवार यांचे विमान क्रॅश होताच त्याला भीषण आग लागली आणि विमानाचे तुकडे उडाले. घटनास्थळी सुरक्षा यंत्रणा, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या टीम्स तातडीने पोहोचल्या आणि आग विझवण्याचे जोमाने प्रयत्न करण्यात आले. अजित पवार यांच्या पार्थिवाची ओळख त्यांच्या घड्याळावरून झाली. हे घड्याळ त्यांची ओळख पटवण्यासाठी मुख्य निशाणी ठरली. अजितदादा यांचे पार्थिव गावकऱ्यांच्या मदतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणण्यात आला.
