जिद्द व चिकाटीने घेतली गरुड भरारी…

दिव्यांग मुलगी झाली लिपिक

ठाणे: घरची परिस्थिती हालाखीची आई गृहिणी तर वडील  मोलमजूरी करुन आपल्या कुटुंबाचा गाढा चालवितात.अगदी हातावर पोट असलेल्या या कुटुंबातील गरीबीचे चटके सहन करत ज्योतीने आपल्या या परिस्थितीला तोंड देत ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाली असून रहाटोली येथील प्राचार्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेत लिपिक या पदावर ती रुजू झाली आहे.

शहापूर पासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील शेंडेगाव येथील ज्योती किसन थोराड ही आदिवासी समाजातील मुलगी दोन्ही पायांनी दिव्यांग आहे.वयाच्या एक वर्षांची असताना पोलिओमुळे ज्योतीला अपंगत्व आले मात्र शालेय अभ्यासक्रमातील तीची हुशारी पाहता मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तीचे वडील किसन थोराड यांनी ज्योतीच्या शिक्षणाकडे विशेष असे लक्ष केंद्रित केले.दिव्यांग असल्याने इयत्ता पहिली ते पदवीधर पर्यंतचे शिक्षण होईपर्यंत ज्योतीला शाळेत घेऊन जाणे घेऊन येण्याचे काम वडील किसन थोराड यांनी केले.आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पदवीधर झाल्यानंतर ज्योतीला शासकीय नोकरी मिळविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन लाभले ते शालेय शिक्षकांचे त्यासाठी शिक्षकांनी तीला पुस्तकेही उपलब्ध करून दिली.दिवस रात्र अभ्यास करून ज्योती स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाली असून नुकतीच ती बदलापूर(रहाटोली) येथील  प्राचार्य शिक्षण प्रशिक्षण संस्था येथे लिपिक पदावर रुजू झाली आहे.आई वडीलांचे कष्ट मी डोळ्यासमोर पाहतेय मोलमजुरी करणाऱ्या वडीलांचं स्वप्न साकार करण्यासाठी शिक्षणाशिवाय मला पर्याय नाही काहीतरी शिक्षण घेऊन बनायचं या माझ्या प्रचंड दुर्दम इच्छाशक्तीच्या जोरावर मी हे स्पर्धा परीक्षेचे यश संपादन केलं आहे असं ज्योती हीने बोलताना सांगितलं. दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या ज्योती हीच्या अभुतपूर्व यशाबद्दल आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या तीच्या आई वडिलांचं संपूर्ण शहापूर तालुक्यात सर्वत्र आता कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *