डोंबिवलीत भव्य राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शन
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आयोजन
आरती परब
डोंबिवली : डोंबिवलीकरांना वर्षभर प्रतीक्षा असलेले डोंबिवली रोझ फेस्टिवल हे भव्य गुलाब पुष्प प्रदर्शन शनिवार ३१ जानेवारी आणि रविवारी १ फेब्रुवारी आयोजित करण्यात आले आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल रामनगर येथील बालभवन येथे संपन्न होत आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सर्वात मोठे गुलाब पुष्प प्रदर्शन असून यंदाचे १६ वे वर्ष आहे.
नागपूरच्या प्रशांत तेलंग यांनी यंदाचा डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल गाजवला. त्यांच्या फुलांना गुलाबांचा राजा, गुलाबांची राणी, सर्वोत्तम सुवासिक गुलाब आणि सर्वोत्तम भारतीय प्रजाती गुलाब यांसह एकूण १६ बक्षिसे मिळाली. टिळक उद्यान, मंछेर इराणी, मन्सूरा हसन, चंद्रकांत मोरे, आशिष मोरे, सुरेश पोकळ यांच्या गुलाबांना विविध गटांत पारितोषिके मिळाली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित उपमहापौर राहुल दामले, कडोंमपा भाजपा गटनेते शशिकांत कांबळे, जेष्ठ माजी नगरसेवक संतोष केणे, भाजपाचे डोंबिवलीतील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांसह भाजपा डोंबिवली पूर्व व पश्चिम मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. इंडियन रोझ फेडरेशनच्या अध्यक्षपदी अर्शद भिवंडीवाला आणि खजिनदारपदी जगदीश म्हात्रे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच प्रसिद्ध गुलाबतज्ज्ञ कल्याणचे डॉ विकास म्हसकर यांचा डोंबिवलीकर गुलाब महोत्सवाला गेली १६ वर्षे सहभाग घेतल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
डोंबिवलीकर गुलाबप्रेमी नागरिक बंधू भगिनी विशेषतः सर्व वयोगटातील महिला वर्ग आपल्या कुटुंबासह गुलाबांच्या अनोख्या दुनियेत अतिशय रमलेले दिसले. इंडियन रोझ फेडरेशन ह्या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील मोठमोठ्या गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये निमंत्रित करण्यात येते. मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नाशिक आणि नागपूर येथून प्रदर्शक सहभागी झाले आहेत.
डोंबिवली रोझ फेस्टिवल म्हणजे डोंबिवलीकरांच्या कॅलेंडर मधला “अनिवार्य उपस्थितीचा” असा विषय असतो. हजारो डोंबिवलीकर रांग लावून शिस्तीत गुलाबांची मोहक दुनिया अनुभवायला आणि गुलाब रोपे विकत घेण्यासाठी येतात. गेली १४ वर्षे डोंबिवलीकर रोझ फेस्टिवल आणि सेलिब्रिटी उपस्थिती हे समीकरण जुळले आहे, हे विशेष. दर्दी गुलाबपुष्प रसिकांना हे प्रदर्शन म्हणजे पर्वणी असते त्याचबरोबर हल्ली सोशल मीडियावर पोस्ट, स्टोरी आणि रिल्ससाठी युवापिढी गर्दी करताना दिसते. प्रदर्शन विनामूल्य असून शनिवारी ३१ जानेवारी आणि रविवारी १ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १० दरम्यान बाल भवन रामनगर डोंबिवली पूर्व येथे खुले राहील.
