केडीएमसी महापौरांनी अधिकाऱ्यांसमवेत केली महापौर निवासाची पाहणी

केडीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे करदात्या नागरिकांच्या पैशांचा चुराडा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर महापौरांची निवड देखील झाली आहे. मात्र महापौरांसाठी महापालिकेच्या वतीने बांधण्यात आलेल्या महापौर निवासस्थानाची दुरावस्था झाली आहे. गेली कित्येक वर्षे हा बंगला बंद असल्याने वाळवी लागली आहे. या महापौर निवासस्थानाची आज केडीएमसी  महापौर हर्षाली चौधरी थविल यांनी शहर अभियंता अनिता परदेशी, अतिरिक्त शहर अभियंता जगदीश कोरे, प्रशांत भागवत, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे यांच्यासह पाहणी केली.

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी जेल परिसरात २०१० साली जनतेचे लाखो रुपये खर्च करून हे महापौर निवासस्थान बांधण्यात आले होते. मात्र, या निवासस्थानाला जाण्यासाठी रस्ता नसल्याने तसेच इतर वादामुळे हे निवासस्थान सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले. बांधकामानंतर अनेक वर्षे हा बंगला वापराविना ओस पडून होता. यानंतर पुन्हा लाखो रुपये खर्च करून बंगल्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, तत्कालीन महापौरांनी केवळ बंगल्याची पूजा करून त्यामध्ये वास्तव न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा हा बंगला वापरात आला नाही. कोरोना काळापासून तर हा बंगला पूर्णपणे बंद अवस्थेत असून, देखभालीअभावी त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.

सध्या बंगल्यातील संपूर्ण लाकडी फर्निचर खराब झाले असून, अनेक ठिकाणी वाळवीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. नियमित देखभाल व संरक्षण न केल्यामुळे महापौर निवासस्थानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली आहे. केडीएमसी प्रशासनाने या बंगल्याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी जनतेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी होणार आहे. या या निवासस्थानाची पाहणी करण्यात येऊन लवकरच या निवासाच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले.

दरम्यान महापौर हर्षाली चौधरी थविल या सद्ध्या मोहने येथे भाड्याच्या घरात राहत असून, महापौर निवासस्थानाची डागडुजी लवकर झाल्यास कल्याणमध्ये महापौर निवासस्थानी राहून नागरिकांच्या कामासाठी जास्तीत जास्त वेळ देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *