ज्येष्ठ नागरिकांना बस प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्रासाठी अर्ज स्वीकृतीला सुरुवात

ठाणे : ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसमधून ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी डिजिटल ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी नमुना अर्ज वितरित करून तो भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या ठाणे स्थानक, कोपरी आगार, आनंदनगर व वागळे आगार येथे अर्ज स्वीकृती सुरू करण्यात आली आहे.

ज्येष्ठ नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता शनिवार, ७ फेब्रुवारीपासून वृंदावन सोसायटी, लोकमान्यनगर टर्मिनस, पवारनगर टर्मिनस व धर्मवीर चौक येथेही अर्ज स्वीकृती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रांवर सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार असून नागरिकांनी नमुना अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल ओळखपत्रानुसार सदर योजना १ मार्च २०२६ पासून सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, ओळखपत्रासाठी आलेल्या अर्जांचा विचार करून सर्व अर्जदार ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र मिळेपर्यंत जुन्या पद्धतीप्रमाणे मोफत प्रवासाची सवलत सुरू राहणार आहे याची नोंद ज्येष्ठ नागरिकांनी घेवून परिवहन सेवेचे सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *