इंतजार मालिकेचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा आगित जळून खाक
अविनाश उबाळे
ठाणे: शहापूर तालुक्यातील आटगाव रेल्वे स्थानका जवळील ११२ वर्ष जुना असलेला व १९९२ च्या काळातील सुपरहिट ठरलेल्या व प्रसिद्ध हिंदी सिने अभिनेते शाहरुख खान याने एकेकाळी भुमिका केलेली दुरदर्शन वरील हिंदी टिव्ही मालिका इंतजार या सिरीयलचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आलेला ऐतिहासिक असा भानुशाली वाडा गुरुवारी दुपारी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेत जळून खाक झाला सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
निर्माता व दिग्दर्शक सईद मिर्झा यांनी आटगाव येथील या वाड्यात २६ भागांची मालिका असलेल्या इंतजार या सिरीयलचे संपूर्ण चित्रीकरण या वाड्यात व आटगाव रेल्वे स्थानकावर चित्रित केले होते.ऐकाकाळी प्रेक्षकांना या मालिकेने प्रचंड अशी भुरळ घातली होती अशा या लोकप्रिय ठरलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर १९९२ च्या काळात अधिराज्य गाजवणाऱ्या इंतजार मालिकेचा साक्षिदार म्हणून ओळख असलेला हा ऐतिहासिक वाडा आगिच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने या मालिकेच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली.
साधरण सव्वाशे वर्षांपूर्वी हा भानुशाली वाडा आटगाव रेल्वे स्थानका नजीक बांधण्यात आला होता संपूर्ण लाकडाचे असे अप्रतिम बांधकाम असलेल्या व आजूनही हे लाकडी बांधकाम शाबूत असलेला हा वाडा अनेक वर्षे मजबूतीने उभा होता या वाड्याचे मालक प्रदीप दामोदर भानुशाली व त्यांच्या पत्नी पुजा हे वृद्ध दांम्पत्य येथे राहत होते.गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक वाड्यातून धूर निघू लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी वाड्याकडे धाव घेतली असता वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याचे दिसून आले प्रसंगावधान राखत या या वृद्ध दाम्पत्यांनी घराबाहेर धाव घेतली व ते सुरक्षित बाहेर पडल्याने ते आगीपासून सुरक्षित वाचले व यामुळे वाड्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र हा ऐतिहासिक वाडा आगीत जळून गेल्याने येथील मौल्यवान लाकडी वस्तू व काही जीवनावश्यक वस्तू कपडे तसेच वाड्यातील काही दुर्मिळ साहित्य संपूर्णपणे जळून उद्ध्वस्त झाले आहे.या आगीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आटगाव ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य सुरु केले व आग विझवण्यासाठी शहापूर नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली.आग अशी लागली असावी याचे कारण मात्र अद्यापही समजू शकलेले नाही असे सांगण्यात येत आहे.पोलीस या संदर्भात तपास करीत आहेत.
