अकोला : राज्य निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेना गीतातून जय भवानी शब्द हटवण्याची नोटीस बजावली असतानाच आज अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांनी जय भवानी, जय शिवाजीचा नारा बुलंद केला. निवडणूक आयोगाच्या विरोधात उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत जय भवानी बोलणारच असं ठणकावले होते. या पार्श्वभुमीवर अमित शहा यांनी जय भवानीचा घोष करून उध्दव ठाकरेंना मात देण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे आता निवडणूक आयोगाची मात्र पंचाईत झाली आहे.
महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, अवघ्या महाराष्टातून जास्तीत जास्त उमेदवार निवडून आपणास मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे. ४०० पार आकडा गाठायचा आहे आणि त्यासाठी महायुतीचे अकोल्याचे उमेदवार अनुप धोत्रे यांना विजयी करायचं आहे, असं म्हणत यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
अमित शाह म्हणाले, अकोल्याच्या भूमीवर सर्वात आधी मी छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, गजानन महाराज यांना अभिवादन करतो. आज हनुमान जयंती आहे. आता थोड्या दिवसांपुर्वी अयोध्येत मोदीजींनी राममंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. इंडी आघाडीने आतापर्यंत राममंदिर होऊ दिलं नाही. पाच वर्षात मोदींनी केस जिंकली, भूमिपूजन केलं आणि राममंदिराचं उद्घघाटनही केलं. त्यांनी 70 वर्ष राम मंदिर अडकवून ठेवलं. म्हणूनच विकासासाठी
महाराष्ट्राने संकल्प करायचा आहे की, प्रत्येक जागेवरून कमळ फुलवायचं आहे असे प्रतिपादन अमित शहा यांनी केले.
अमित शाहा यांच्यासह व्यासपीठावर उमेदवार अनुप धोत्रे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार भावना गवळी, आमदार अमोल मिटकरी, विभागातील अनेक भाजप आमदारांसह महायुतीतील सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.