कोल्हापूर : जोतिबाच्या नावनं चांगभलंच्या गजराने आज अवघा जोतिबा डोंगर निनादून गेला…दख्खनचा राजा जोतिबा देवाच्या तीन दिवसीय चैत्र यात्रेचा आजचा मुख्य दिवस होता. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या कोल्हापूरच्या जोतिबाच्या दर्शनाला आठ लाखाहून अधिक भाविकांनी गर्दी केली आहे. गुलालाची मुक्त उधळण करत लाखो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर दाखल झाल्या आहेत. दाखल होत आहेत.
केवळ महाराष्ट्रातून नाही, तर दक्षिण भारतातून भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. मानाच्या सासनकाठीचं पूजन झाल्यानंतर संध्याकाळी पालखी सोहळा पार पडला. यंदा पाऊसमान चांगला व्हावा, रोगराई येऊ नये, असं साकडं भाविकांनी जोतिबाला घातलं. यात्रा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे. जोतिबा मंदिरात येऊन तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता झाली.
जोतिबा चैत्र यात्रेला वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या सासनकाठ्या हे यात्रेचं एक प्रमुख आकर्षण असतं. या मिरवणुकीमध्ये 20 फुटांपासून ते 70 ते 80 फुटांच्या उंचच उंच सासनकाठ्या सहभागी असतात. सासनकाठी खांद्यावर घेऊन नाचणं, तोरण्या सांभाळणं हे अतिशय कौशल्याचं काम असतं. अनेकजण आपापल्य भागातील सासनकाठ्या घेऊन जोतिबा यात्रेस बहुतांश पायी चालतच येतात. यात्रेत येणाऱ्या असंख्य सासनकाठ्यांपैकी 108 काठ्या मानाच्या असून त्यांना देवस्थान समितीच्या वतीने क्रमानुसार मानपान दिला जातो. या मिरवणुकीमध्ये क्रमवारे पहिला मान पाडळी (जि.सातारा), त्यानंतर मौजे विहे (ता.पाटण), कसबा डिग्रज (ता.मिरज), कसबा सांगाव (ता.कागल) या सासनकाठ्यांना विशेष मान दिला जातो.