सांगली : काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सांगलीतून बंडखोरी केल्याने उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांची तातडीची बैठक गुरूवार दि. २५ एप्रिल रोजी सांगलीत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.
पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पाटील यांनी पक्षाने उमेदवारी दिलेली नसताना लोकसभा निवडणुकीत आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मविआबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून पक्षाची अधिकृत भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहचविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीस पक्षाचे आमदार व पदाधिकारी यांना आमंत्रित करण्याच्या सूचना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रमसिंह सावंत यांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, विशाल पाटील यांनी बंडखोरी करून आपली उमेदवारी कायम ठेवल्याबद्दल त्यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता पक्षिय पातळीवरून व्यक्त केली जात असून उबाठा शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी तशी मागणीही काँग्रेसकडे केली आहे. यामुळे या बैठकीत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांच्याकडून कारवाई केली जाण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, आपण पक्षाचा कोणताच आदेश डावललेला नाही. यामुळे आपल्यावर निलंबनाची कारवाई होऊच शकत नसल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले. पक्षाकडून काय करायचे, अथवा काय नाही करायचे याच्या कोणत्याच सूचना आलेल्या नाहीत. अथवा लेखी खुलासाही मागविला नाही. यामुळे माझ्यावर पक्षाकडून कारवाईचा प्रश्‍नच उद्भवत नसल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *