शिंदेंच्या शिवसैनिकांनी प्रचार थांबवला
रत्नागिरी : शिवसेनेचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी हट्ट करूनही हक्काची शिवसेनेची जागा भाजपाने हिसकावून तेथून नारायण राणे यांनी तिकीट दिल्याने आधीच शिवसैनिकांमध्ये असणारा रोष आज आणखिन वाढला. याला निमित्त ठरलंय ते नारायण राणेंचं पोस्टर. भाजपच्या पोस्टरवरून शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे गायब असल्याने त्यांचा प्रचार करणार नाही असा पवित्रा शिंदेंच्या शिवसेनेने घेतला आहे.
रत्नागिरीत नारायण राणेंच्या प्रचाराचा पक्षादेश मान्य करत प्रचाराला लागलेला शिवसैनिक चलबिचल झाल्याचे पहावयास मिळाले. शिवसैनिकातील वाढत्या नाराजीचा फटका राणेंना बसू शकतो.
शिवसैनिकांत असलेली ही नाराजी दूर करण्याचे काम मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्याकडून केले जात होते. त्यातच उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर चक्क बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नसल्याने शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे. सिंधुदुर्गात भाजप आपल्याला विश्वासात घेऊन काम करत नसल्याचं शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगत आहेत. जो पर्यंत विश्वासात घेऊन काम करत नाही तोपर्यंत लोकसभेच काम करणार नसल्याचे शिवसेनेने म्हटलं आहे.
येत्या 7 मे रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. मतदानाला अवघे पंधरा दिवस बाकी असताना अजूनही शिवसेना शिंदे गट भारतीय जनता पार्टी यांच्यात समन्वय बैठका सुरू असल्याने कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमाचं वातावरण असल्याचं दिसतंय.