महाराष्ट्रावर अवकाळी

पावसाचे संकट कायम!

मुंबई : देशाच्या हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठा बदल पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेच्या झळा  बसत आहेत, तर कुठे मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. आजही हवामान विभागाने राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी रात्रीपासूनच पावसाची रिमझिम सुरु आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजनुसार, पुढील 24 तासांत विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. खामगाव आणि शेगाव परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पहाटेपासूनच जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. शेगाव परिसरात अनेक घराचं नुकसान झालं आहे. दरम्यान, महायुतीच्या प्राचार सभेवर पावसाचं सावट आहे. आज सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत खामगाव येथे प्रचार सभा होणार आहे. यावर पावसाचं संकट आहे.

वेधशाळेने यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या स्वरूपात गारा पडण्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, मारेगाव, वणी, कळंब, राळेगाव तालुक्यात ढग दाटून येऊन पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे प्रचंड उकड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वणी तालुक्यातील आकापूर शेत शिवारात बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैल जागीच मृत्यू झाला. मारेगाव आणि कळंब तालुक्यातील काही भागांमध्ये हलक्या गारासह पाऊस पडला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन ते तीन दिवस दिवसाकरिता ढगाळ वातावरण असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या वाडेगाव आणि हिंगणा गावाला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आधीच अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा आजच्या पावसाने हतबल झालाय. दरम्यान, हवामान विभागाने अकोल्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा अंदाज दिला होता, त्यानुसार आज अकोला जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वाढत्या तापमानात आजचा पाऊस अकोलेकरांना काहीसा दिलासादायक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *