आपल्या देशात वैद्यक शास्त्रात विविध उपचार पद्धती म्हणजेच पॅथी कार्यरत आहेत. या उपचार पद्धतींसाठी अभ्यासक्रमाही उपलब्ध आहेत. यातील ज्या पॅथीचे शिक्षण घेतले असेल त्याच पॅथीचा उपयोग करून डॉक्टरांनी निदान निदान करावे आणि उपचार करावे. जर या सर्व पॅथींचा एकत्रित उपयोग करून उपचार केले तर त्याला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध असेल असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन या ऍलोपॅथी डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर व्ही असोकन यांनी दिली असल्याची माहिती आहे. नागपुरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नागपूर शाखेच्या नव्या कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात त्यांनी हे विधान केल्याचे वृत्त आले आहे.
आपल्या देशात आयुर्वेद ही प्राचीन उपचार पद्धती आहे. या पद्धतीत अनेक ऋषीमुनींनी संशोधन करून अभ्यासपूर्ण असे विवेचन करून ठेवलेले आहे. आजही आयुर्वेद ही एक प्रभावी उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते. आपल्या देशात जेव्हा मुसलमानांनी आक्रमण केले आणि इथेच मुक्काम ठोकला, तेव्हा त्यांच्याकडची युनानी पद्धती आणि हकीम नामक वैद्यही इथे वापरात येऊ लागले. नंतर इंग्रज जसे आले तसे त्यांच्याबरोबर ऍलोपॅथीचे डॉक्टरही आलेत. मात्र ऍलोपॅथी ही जास्त प्रगत असल्यामुळे ही उपचार पद्धती देशभरात लवकर रूढ झाली.
याच काळात परदेशातूनच होमिओपॅथी ही उपचार पद्धती देखील आणली गेली. ही उपचार पद्धती काहीशी वेगळी आहे. मात्र ऍलोपॅथीच्या तुलनेत थोडी स्वस्त आहे तशीच हुकमी फायदा देणारी देखील आहे.त्यामुळे ऍलोपॅथी सोबत होमिओपॅथीही देखील भारतात रुजायला वेळ लागला नाही. आज आयुर्वेद होमिओपॅथी आणि ऍलोपॅथी या तीनही उपचार पद्धती काम करीत आहेत.
याशिवाय देखील इतर उपचार पद्धती आहेत त्यात नॅचर्रोपॅथी, मॅग्नेटोथेरपी, योगा थेरपी अशा विविध पॅथी कमी जास्त प्रमाणात सक्रिय आहेत. या सर्वच पॅथींचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जातात आणि त्यांना कमी जास्त प्रमाणात फायदाही मिळतो.
या सर्वच पॅथीनमध्ये त्यांच्या त्यांच्या काही विशेषता आहेत. त्यामुळे या पॅथींचा एकत्रितपणे अभ्यास व्हावा आणि या अभ्यासक्रमातून तयार झालेले तज्ञ डॉक्टर्स समाजासाठी उपलब्ध करून द्यावे अशी सूचना सुमारे २५ वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एक निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. नीतू मांडके यांनी नागपुरात एका पत्र परिषदेत केली होती. डॉ. मांडके यांच्या मते या सर्व पॅथींना एकत्र करून त्यांचा एक कॉम्पोझिट अभ्यासक्रम बनवला जावा. पहिल्या वर्षी वैद्यकीय शिक्षण घ्यायला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या सर्व पॅथींची तोंड ओळख करून दिली जावी. नंतर पुढे जाऊन कोणत्या पॅथीत विशेष शिक्षण घ्यायचे आहे ते विद्यार्थ्याने ठरवावे, आणि त्यानुसार शिक्षण घ्यावे. नंतर शिक्षण पूर्ण होऊन रुग्णसेवा करायला लागल्यावर जरूर पडेल त्याप्रमाणे या सर्व पॅथींचा एकत्रितपणे उपयोग त्या विद्यार्थ्याला करता यावा, या दृष्टीने त्याला शिक्षण दिले जावे, असे डॉ. मांडके यांनी सुचवले होते.
डॉ. मांडके यांच्या या सूचनेवर कधीच विचार केला गेला नाही. आपल्या देशात एकूणच समाज व्यवस्थेवर ऍलोपॅथी या पद्धतीत प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांचा प्रभाव आहे. अशी प्रॅक्टिस करणाऱ्या बहुसंख्य डॉक्टरांना प्रॅक्टिस मध्ये इतर पॅथींचा उपयोग केलेला चालत नाही. त्यांच्याकडे येणारा एखादा रुग्ण एखादे आयुर्वेद किंवा होमिओपॅथीचे औषध पूरक म्हणून घेत असेल असे त्याने सांगितले तर हे ऍलोपॅथीप्रेमी डॉक्टर त्याला तत्काळ ते औषध बंद करायला सांगतात, इतका त्यांचा इतर पॅथींवर राग आहे. मात्र खाजगीत हेच डॉक्टर्स स्वतःच्या व्यक्तिगत गरजांसाठी कधी होमिओपॅथी तर कधी आयुर्वेदाचा उपयोग करताना दिसतात.
नीतू मांडके यांची ही सूचना खरोखरीच आजही विचार करता येण्याजोगी आहे. आधी म्हटल्याप्रमाणे सर्वच पॅथींची काही विशेषता आहे. आयुर्वेदात आम्ही नाडी परीक्षा करून रोग निदान करतो. त्याचवेळी ऍलोपॅथी मध्ये विविध पॅथॉलॉजी टेस्ट्स तसेच एक्स-रे सोनोग्राफी एम आर आय असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. हृदयरोगासारख्या जीवघेण्या आजारातही निदानासाठी ईसीजी इको ट्रेडमिल टेस्ट एन्जिओग्राफी अशा विविध प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत. या टेस्टच्या मदतीने रोगाचे नेमके निदान होते हे नक्की. अशा वेळी या ऍलोपॅथिक पद्धतीने असे रोगाने दान करून घेतले आणि नंतर रुग्णाने त्याला हव्या त्या पॅथीतून
औषधे घेतली तर हरकत काय आहे? आज अनेक व्याधी अशा आहेत की त्यांना ऍलोपॅथीमध्ये निर्णायक उपाय नाहीत. अशावेळी होमिओपॅथी किंवा आयुर्वेद या उपचार पद्धती कामाच्या ठरतात. वस्तूतः आयुर्वेदामध्ये तर विपुल ज्ञान भंडार उपलब्ध आहे. मात्र पुरेसे संशोधन न झाल्यामुळे ते ज्ञानभांडार उपयोगात येत नाही ही वस्तुस्थिती आहे.
हे सर्व मुद्दे लक्षात घेत ऍलोपॅथी डॉक्टरांनी हा विरोध सोडायला हवा. जर या भिन्न पॅथी उपयोगात आणल्या गेल्या तर आमच्या व्यवसायावर त्याचा परिणाम होईल अशी त्यांना भीती वाटत असावी. मात्र जर या सर्व पॅथी एकत्र आणून उपचार केले तर रुग्णांचे आजार अधिक गतिशीलतेने आटोक्यात आणता येतील, आणि असे लाखो रुग्ण या डॉक्टर मंडळींनाच दुवा देतील यात शंका नाही. जशी सूचना डॉ. नीतू मांडके यांनी केली, तशीच सूचना सुमारे पाच वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही केली होती. या सर्व पॅथींचा एकत्रितपणे अभ्यास व्हावा आणि ज्या पद्धतीने ज्या रुग्णाला फायदा देता येईल तसा द्यावा असे गडकरींनी एका डॉक्टर मंडळींच्याच संमेलनात बोलताना सुचवले होते. मात्र डॉक्टर मंडळींनी त्यावर विचार केला नाही. आजही समाजात फिरल्यास आम्हाला आयुर्वेदाने फायदा झाला, होमिओपॅथीने आमचा दमा आटोक्यात आला, असे सांगणारे असंख्य रुग्ण भेटतात. अशावेळी या सर्व उपचार पद्धतींचा एकत्रितपणे अभ्यास करण्याची गरज अधिकच अधोरेखित केली जाते. सुदैवाने सध्या देशात सत्ताधारी असलेल्या नरेंद्र मोदी सरकारने या विविध उपचार पद्धतींचा एकत्रितपणे वापर करण्यासाठी आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. मात्र तिथेही ऍलोपॅथी डॉक्टरांचाच वरचष्मा आहे. त्यामुळे अजूनही नीतू मांडके यांच्या सूचनेवर पुरेसा विचार झालेला नाही. अजूनही डॉक्टर आर व्ही असोकन यांच्यासारखे ऍलोपॅथीप्रेमी मिक्सोपॅथीला म्हणजेच या मिश्र उपचार पद्धतीला विरोध करतात.
इथे आणखी एका मुद्द्याकडे लक्ष वेध घ्यायला हवे. ज्यावेळी देशात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होणार हे स्पष्ट झाले, त्यावेळी आयुष मंत्रालयाने आर्सेनिक अल्ब हे होमिओपॅथीक औषध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्णांना घेण्यासाठी सुचवले होते. अनेकांनी हे औषध घेतले त्याचा फायदाही झाला. त्याचप्रमाणे अनेक होमिओपॅथी डॉक्टरांनी त्यांच्या नियमित रुग्णांना कोविडपासून संरक्षण म्हणून विविध औषधेही आधीच दिली होती. त्याचाही मोठ्या प्रमाणात फायदा झालेला दिसला.
हे सर्व मुद्दे लक्षात घेत या ऍलोपॅथीप्रेमी डॉक्टर मंडळींनी आता भानावर येणे गरजेचे आहे. प्रत्येक पद्धतीत जे चांगले आहे ते घेऊन एक संपूर्णतः सक्षम अशी उपचार पद्धती कशी तयार करता येईल याचा विचार या डॉक्टर मंडळींनीच करायला हवा. तसा विचार झाला तर या देशातील बहुसंख्य जनता तुम्हाला दुवा देईल.अन्यथा हेच रुग्ण तुम्हाला खलनायक ठरवल्याशिवाय राहणार नाहीत, हा धोकाही लक्षात घेतला पाहिजे.