रक्तदानातील उत्कृष्ट कार्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे एसएसटी महाविद्यालयाचा गौरव
कल्याण : सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या एस.एस.टी. कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटचा मुंबई विद्यापीठातर्फे प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रक्तदान शिबिरांच्या यशस्वी आयोजनाबरोबरच जनजागृतीत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची ही दखल आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी भवन येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात विद्यापीठाच्या एनएसएस सेलचे ओएसडी प्रा.सुशील शिंदे, कार्यक्रम अधिकारी रमेश देवकर तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा एनएसएसचे ठाणे जिल्हा समन्वयक प्रा.जीवन विचारे आणि एनएसएस स्वयंसेवक उपस्थित होते. एस.एस.टी. महाविद्यालयाने रक्तदान शिबिरांसाठी व्यापक जनजागृती करत विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवले. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून रक्तदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून प्रत्यक्ष शिबिरांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
महाविद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थापक प्राचार्य डॉ. पुरस्वानी यांनी सांगितले की, एस.एस.टी. महाविद्यालय सामाजिक जबाबदारी जपत रक्तदानाबरोबरच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बालके, समाजातील उपेक्षित घटक आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रातही सातत्याने कार्यरत आहे. भविष्यातही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत समाजासाठी कटिबद्ध राहण्याचा महाविद्यालयाचा निर्धार आहे.
