पुणे : पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील जागृत देवस्थान असलेला श्री. हनुमान जयंती उत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २३  एप्रिल २०२४  रोजी मोठ्या उत्सवात संपन्न झाला.  हनुमान जयंती उत्सवानिमित्त आलेल्या भाविकांनी देवाचे दर्शन घेऊन,  शेरणी वाटप झाल्यानंतर  पुरी,  गुळवणी व कांद्याच्या चटणी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

थोरांदळे येथील ग्रामस्थ दरवर्षीप्रमाणे शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आपल्या जागृत श्री. हनुमान जन्माचा सोहळा साजरा करतात. थोरांदळे गावचे ह. भ. प. श्री. विलास मिंडे महाराज यांचे पहाटे हनुमान जन्माचे व काल्याचे किर्तन झाले. त्यानंतर वाजत गाजत शेरणी वाटप,  हारतुरे व आलेल्या भक्तांना महाप्रसाद दिला. यासाठी गावातील महिलांनी बनविलेल्या ३ लाखाहून अधिक पुऱ्या,  ५  पिंप गुळवणी व ३०० किलोहून अधिक चटणी बनविण्यात आली होती. या सोहळ्यासाठी पुणे मुंबईहून  मोठ्या प्रमाणात भाविक आले होते. उत्तर पुणे जिल्ह्यातील हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. हनुमान जयंती उत्सव कार्यक्रमाची सर्व व्यवस्था श्री. मारुती देवस्थानचे सर्व ट्रस्टी,  ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी,  थोरांदळे ग्रामस्थ,  मुंबईकर मंडळी,  महिला व युवक मंडळांनी एकत्रितरित्या यशस्वीपणे केली.  या सोहळ्यासाठी आंबेगाव तालुक्यातील रांजणी,  वळती,  नागापूर, भराडी, जाधवाडी, मांजरवाडी, खडकी, निरगुडसर, पिंपळगाव, चांडोली, लवकी या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसऱ्या दिवशी बैलगाड्यांच्या भव्य शर्यती झाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *