माथेरान : अनेक वर्षांपासून नावाजलेल्या माथेरान पर्यटनस्थळावर पहिल्यांदाच मागील दोन महिन्यांपासून तीव्र मंदीची झळ स्थानिकांना सोसावी लागत आहे त्यामुळे इथे जी काही थोड्याफार प्रमाणात विकासकामे मार्गी लागली आहेत आणि अजूनही काही कामे पूर्णत्वाकडे जाताना दिसत आहेत. पर्यटकांना अभिप्रेत असणाऱ्या सोयीसुविधाचा अभाव त्याचप्रमाणे काही व्यावसायिक यांच्याकडून दिशाभूल होऊन पर्यटकांचा एकप्रकारे खिसा रिकामा करण्यासाठी प्रयत्न केला जाणाऱ्या
व्यावसायिक यांच्यामुळे इथे पर्यटक फिरकत नाहीत की ह्या गावाला विकासाच्या प्रवाहात आणताना काही विघ्नसंतोषी लोकांमुळे खोडा घातला जात असल्याने महत्वपूर्ण विकास कामे जलदगतीने मार्गी लागत नाहीत. काळानुसार पर्यटन वाढीसाठी आवश्यक बदल घडवून आणणे गरजेचे आहे परंतु स्वतःच्या व्यावसायासाठी गावाच्या विकास कामांना खोडा घालून एकप्रकारे ठेकेदाराला वेठीस आणून आपल्या पदरात चिरीमिरी पाडून घेण्यासाठी काही मंडळी याबाबत निष्णात आहेत. परंतु यामध्ये नकारात्मक धोरणामुळे हे छोटेसे गाव प्रगती पासून खूपच दूर फेकले जात आहे. सद्यस्थितीत इथे पर्यटकांचा भरणा अल्पप्रमाणात दिसून येत आहे. ज्यांची हातावर कमाई आहे अशा लहानसहान स्टोल्स धारकांना,तसेच मोलमजुरी करणाऱ्या श्रमिकांना मंदीचा सामना करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मुंबई पुण्यापासून अगदी जवळ असणाऱ्या याठिकाणी वर्षाचा सुट्टयांचा शेवटच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत प्रथमच तीव्र मंदी आल्यामुळे वाढत्या महागाईला तोंड देताना महिला वर्गाला त्रासदायक बनले आहे. पर्यटकांना अभिप्रेत असणारी महत्वपूर्ण कामे आजही पूर्ण झालेली नाहीत.इथल्या विकासाला ब्रेक लागत असल्यामुळे याचाच पर्यटनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे. परिणामी प्रशासनाच्या अधिकारी वर्गाचा हतबलपणा की मतांच्या राजकारणा पायी सर्वच मतदारांना गोंजारणार्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधीमुळे विकास खुंटत चालला आहे हा सुद्धा संशोधनाचाच विषय बनला आहे. त्यासाठी कार्यक्षम लोकप्रतिनिधीची माथेरानला आवश्यकता आहे अशीही चर्चा ऐकावयास मिळत आहे.
