कंत्राटी कामगार आणि वारसा हक्काचे प्रश्न मार्गी लागणार- संजय केळकर
अनिल ठाणेकर
ठाणे- ठाणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या सुविधा आणि किमान वेतनाबरोबरच प्रलंबित असलेली वारसा हक्क प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी संजय केळकर यांना सांगितले. यावेळी आयुक्तांनी ठाण्यातील कलर म्युझियम प्रकल्पाला चालना देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
संजय केळकर यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत विविध समस्यांवर चर्चा केली. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक सुनेश जोशी, सीताराम राणे, विकास पाटील तसेच अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सर्व विभागांचे उपायुक्त उपस्थित होते.यावेळी आमदार संजय केळकर यांनी कंत्राटी कामगारांच्या समस्या आणि प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांबाबत चर्चा केली. महापालिकेत कंत्राटी कामगारांची संख्या मोठी असून कंत्राटदार कामगारांची पिळवणूक करत आहेत. कामगारांना विविध सेवा सुविधांपासून वंचित ठेवून किमान वेतनही देण्यात येत नसल्याचे केळकर यांनी सांगितले. कंत्राटदारांनी नियमानुसार कामगारांना सुविधा द्याव्यात किमान वेतन द्यावे अन्यथा त्यांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी आयुक्तांकडे केली. प्रलंबित वारसा हक्क प्रकरणांची संख्या मोठी असून ती प्राधान्याने निकाली काढावीत अशी मागणी करताना केळकर यांनी विविध महापालिकांचे दाखले दिले. यावर आयुक्त सौरभ राव यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबरोबरच वारसा हक्काची प्रकरणे प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील, असे स्पष्ट केले. गेल्या एक वर्षापासून कलर म्युझियमबाबत आग्रही असून ठाण्यात जागतिक स्तरावरचे कलर म्युझियम उभे राहू शकते. या प्रकल्पाला वेग देण्याची मागणी केळकर यांनी केल्यानंतर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले. मालमत्ता विभागाच्या शहरात शेकडो मालमत्ता असून त्याचा वापर भलतेच करत असून त्याचे भाडेही घेत आहेत. या बळकावलेल्या मालमत्ता ताब्यात घेऊन संबंधितांना नोटिसा बजावाव्यात तसेच मालमत्ता विभागाची श्वेत पत्रिका काढण्याची मागणी केळकर यांनी केली. यावेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.२०१७ साली अंगावर झाड पडून एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. केळकर यांनी त्या नागरिकाच्या पत्नीला महापालिकेत नोकरी मिळावी यासाठी पाठपुरावा करून अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता.  प्रशासनाने महिलेस नोकरी देण्याचेही कबूल केले होते. मात्र अद्याप त्या महिलेस नोकरी देण्यात आली नसल्याचे केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. या विषयाबाबतही आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले.शहरात फेरीवाला धोरण राबविण्यात न आल्याने एक फेरीवाल्याच्या जागी दहा फेरीवाले झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना चालायला पदपथ, रस्ते नाहीत असे सांगत केळकर यांनी फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी तातडीने करण्याची मागणी केली.या बैठकीत मसाला गिरणी बंद करणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई, महावितरणच्या सबस्टेशनला जागा उपलब्ध करून देणे, कौशल्य हॉस्पिटल येथे पार्किंगसाठी होत असलेली शुल्क आकारणी, कंत्राटी शिक्षकांच्या समस्या, खासगी गृह संकुलांमध्ये झाडांच्या फांद्यांची मोफत छाटणी, सुरळीत पाणीपुरवठा, नाले बांधणी, विहिरींचे पुनरुज्जीवन आदीबाबत चर्चा करून तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *