रोह्यातील ‘डीआरटी अँथिया’ कंपनीतील कामगारांना १४ हजारांची विक्रमी वेतनवाढ
अनिल ठाणेकर
ठाणे, ‘धर्मराज्य पक्ष’प्रणित ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या युनियनचा रायगड जिल्ह्यात झंझावात सुरु झाला असून, रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी या औद्योगिक क्षेत्रात असलेल्या, ‘डीआरटी अँथिया अरोमा केमिकल्स प्रा. लि.’ या कंपनीतील सुमारे १०५ कायम कामगार सभासदांना तब्बल १४ हजार रुपयांची थेट पगारवाढ मिळाली आहे. ‘धर्मराज्य’चे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या औद्योगिकक्षेत्रातील ज्वलंत कामगार-नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली; तसेच, त्यांच्या कामगारक्षेत्रातील चळवळीला साजेशी ही भरघोस पगारवाढ झाल्याने, रायगड जिल्ह्यात अभिमानास्पद असा औद्योगिक चमत्कार घडला आहे.
ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे नुकताच संपन्न झालेल्या, पगारवाढीच्या या पहिल्यावहिल्या त्रैवार्षिक कराराप्रसंगी, व्यवस्थापनाच्या वतीने एचआर प्रमुख लतेश मिरकर, प्रोडक्शन मॅनेजर आशिष दगडे, व्यवस्थापनाचे वकील ॲड. मोहित कपूर; तर, युनियनच्या वतीने उपाध्यक्ष रमाकांत नेवरेकर, महासचिव महेशसिंग ठाकूर, सचिव समीर चव्हाण, युनिट अध्यक्ष प्रदीप जंगम, उपाध्यक्ष निखिल वरणकर, सेक्रेटरी मयुर कोंडे, कार्यकारिणी सदस्य विनोद मगर आणि रामदास साखीळकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. पगारवाढीच्या या करारात, कामगारांना ६० टक्के डीए बेसिकमध्ये आणि ४० टक्के अलाऊन्समध्ये वाढ मिळाली आहे. त्यामुळे याआधी ३० ते ३५ हजार पगार घेणारे कामगार आता, दरमहा ४५ ते ५० हजार पगार घेणार आहेत. त्याचबरोबर, नव्याने भरती होऊन कायम होणाऱ्या कामगाराला, २२ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात होणार आहे, जो आधी एंट्री लेव्हलच्या कामगाराला १३ ते १४ हजार रुपये इतकाच तुटपुंजा पगार मिळत होता, त्यातदेखील या कराराअंतर्गत समाधानकारक वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, ‘डीआरटी अँथिया’ या बहुराष्ट्रीय रासायनिक कंपनीतील कामगारांना, व्यवस्थापनाने गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय कमी वेतनमानावर झुलवत ठेवले होते. मात्र, राजन राजे यांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखालील ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे सभासदत्व स्विकारल्यानंतर, कामगारांना सन्मानजनक वेतन व त्यांचे हक्क मिळावेत यासाठी, युनियनकडून कंपनी व्यवस्थापनासोबत बोलणी सुरु करण्यात आली. परंतु, व्यवस्थापन सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात येताच, राजन राजे यांनी, कामगार सभासदांना आपल्या न्याय्यहक्कासाठी संपावर जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे आदेश दिले. त्यासंदर्भात, कंपनी व्यवस्थापनाला “संपाची सूचना” देण्यात आली होती. अखेर व्यवस्थापनाने सामंजस्याची भूमिका घेत, युनियनने पाठवलेला सेवाशर्तींचा मसुदा मंजूर करुन, पगारवाढीचा त्रैवार्षिक करार संपन्न केला. या करारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने ‘डीआरटी अँथिया’च्या कामगार सभासदांचे अभिनंदन करताना राजन राजे यांनी म्हटले की, “कामगारांनी ‘कामगारधर्म’ जोपासून, आपलं आत्मभान जागं केलं तर, भांडवली व्यवस्थेला शरण येण्यावाचून गत्यंतर नाही. कामगारांना आपली ताकद कळली पाहिजे. कारण, कारखान्यात घाम गाळून उत्पादन काढणारा कामगार, राष्ट्रीय संपत्ती निर्माण करीत असतो. आज कामगारांच्या एकजुटीचा विजय झाला आहे, तुमच्या आतले दिवे आता कुठे पेटायला सुरुवात झालीय, ते तसेच धगधगत ठेवलेत तर, बाहेरच्या सूर्याची तुम्हाला गरजच भासणार नाही!” अशा जाज्ज्वल्य शब्दांत ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी, ‘डीआरटी अँथिया’ कामगारांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या आणि रोहा-धाटाव परिसरातील उर्वरित कामगार-कर्मचारीवर्गाने या करारातून फार मोठा धडा घेण्याचे संकेत यानिमित्ताने दिले.
