विहंगच्या विजयात संदीपची चमक
ठाणे : डावखुरा मध्यमगती गोलंदाज संदीप यादवच्या प्रभावी माऱ्यामुळे विहंग इंटरप्राइजेस संघाने टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट संघावर सात विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत सुवर्ण महोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या क गटात दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. सुनीलने सात धावांत चार बळी मिळवून प्रतिस्पर्ध्यांना ६६ धावांवर रोखले. त्यानंतर विजयी संघाने ३ बाद ६८ धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट संघाच्या एकाही फलंदाजाला संदीपसह शुभम शेवाळे आणि लोहित सुराणाने खेळपट्टीवर टिकू दिले नाही. वेदांत सिंगने सर्वाधिक १५ धावा बनवल्या. तर आनंदराव भोईटेने ११ धावा केल्या. शुभम आणि लोहितने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
त्यानंतर जितेंद्र देशमुखने नाबाद २७ आणि सुधीर यादवने नाबाद १४ धावांची भर टाकली. प्रथमेश कदम आणि फरहान खानने प्रत्येकी १३ धावांची खेळी केली. या डावातील तिन्ही बळी विश्वदीप जाधवने मिळवले. संदीप यादवला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला.
संक्षिप्त धावफलक : टिम वर्क स्पोर्ट्स मॅनेजमेंट: १९.४ षटकात सर्वबाद ६६ (वेदांत सिंग १५, आनंदराव भोईटे ११, संदीप यादव ५-२-७-४, शुभम शेवाळे ४-११-२, लोहित शर्मा २.४-४-२) पराभूत विरुद्ध विहंग इंटरप्राइजेस : १३.२ षटकात ३ बाद ६८ (जितेंद्र देशमुख नाबाद २७, सुधीर यादव नाबाद १४, प्रथमेश कदम १३, फरहान खान १३, विश्वदीप जाधव ७-१-२९-३).
