मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या मुंबई भेटीत खास वेळ काढून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवसोहळा आवर्जुन पाहिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत त्यांनी या शिवसोहळ्याचा अनुभव घेतला. शिवसोहळ्यातील शिवाजी महाराजांचे भारदस्त रुप आणि सोबत निर्माण करण्यात आलेला शिवकालीन साज यामुळे मॅक्रॉन भारावून गेले.
दरम्यान, दिवसभराच्या अधिकृत बैठका आणि बॉलीवूड स्टार्ससोबतची चर्चा आटोपल्यानंतर मॅक्रॉन यांनी रात्री उशिरा आपली पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशनला (सीएसएमटी) भेट दिली. हे स्टेशन केवळ एक रेल्वे टर्मिनल नसून ‘युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट’ आहे.
मॅक्रॉन यांना वास्तुकलेची विशेष आवड आहे. (सीएसएमटी) स्टेशन हे ‘व्हिक्टोरियन गोथिक रिव्हायव्हल’ आणि भारतीय पारंपारिक वास्तुकलेचा एक अद्भूत संगम आहे. ब्रिटीश आर्किटेक्ट एफ. डब्ल्यू. स्टिव्हन्स यांनी डिझाइन केलेली ही इमारत पॅरिस किंवा बार्सिलोनासारख्या ‘गोथिक शहरां’ची आठवण करून देते. मॅक्रॉन यांनी स्टेशनमधील बारीक नक्काशी, घुमट आणि तिथल्या दुकानांची बारकाईने पाहणी केली. भारतीय कारागिरांनी ब्रिटीश शैलीत मिसळलेली भारतीय कला त्यांना जवळून अनुभवायची होती म्हणून त्यांनी बिन्धास्तपणे रेल्वे स्टेशनला भेट दिली.
