ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत
अभिजित दिसलेची आक्रमक फलंदाजी
ठाणे : अभिजित दिसलेची आक्रमक फलंदाजी आणि गोलंदाजांनी त्याला तेवढीच तोलामोलाची साथ दिल्यामुळे मार्श संघाने स्पार्कलेक्स मशीन संघाचा ६४ धावांनी पराभव करत सुवर्णमहोत्सवी ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेत आगेकूच केली. मार्श संघाच्या २३९ धावांचा पाठलाग करताना स्पार्कलेक्स मशीन संघाला १७५ धावा करता आल्या. आपल्या ८१ धावांच्या झंझावती खेळीत सात षटकार आणि तीन चौकार मारणाऱ्या अभिषेकला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय अभिषेकने आपल्या फलंदाजीने सार्थ ठरवला. संघाच्या द्विशतकी धावसंख्येचा पाया रचताना अभिषेकने केवळ ५७ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. अक्षय माजगावकरने ३५, आशुतोष घारगेने आणि आसिफ खानने ३१ धावांचे योगदान दिले. या डावात पराभूत संघाच्या करण चव्हाण, सनी जैस्वाल, जेमिन पांचाळ आत्मिक मॅथेलिया आणि प्रथमेश आंगणेने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
उत्तरादाखल मार्श संघाच्या केतन खरात आणि श्रेयस केसकरने नियंत्रित गोलंदाजी करत स्पार्कलेक्सच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. अर्शमित सिंग पराभूत संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अर्शमितने ६८ धावा केल्या. तर दिव्यांश अरोराने २६ आणि सनी जैस्वालने २० धावा बनवल्या. केतन आणि श्रेयसने प्रत्येकी तीन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – मार्श : ३५ षटकात ७ बाद २३९ ( अभिषेक दिसले ८१, अक्षय माजगावकर ३५, आशुतोष घारगे ३३, आसिफ खान ३१) विजयी विरुद्ध स्पार्कलेक्स मशीन : ३१.५ षटकात सर्वबाद १७५ ( अर्शमित सिंग ६८, दिव्यांश अरोरा २६, सनी जैस्वाल २०, केतन खरात ६-२४-३, श्रेयस केसकर ५.५-२५-३).
