ठाणे : अथर्व अधिकारी, अर्जुन बागायतकरची दमदार शतके आणि आर्यन दलालच्या पाच विकेट्सच्या जोरावर यजमान स्पोर्टींग क्लब कमिटीने मांडवी मुस्लिम संघाचा १८९ धावांनी धुव्वा उडवत ३७ व्या श्रीधर देशपांडे स्मृती समरलीग टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. अथर्वच्या नाबाद १०३ आणि अर्जुनच्या १०४ धावांच्या जोरावर २० षटकात २ बाद २४८ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर आर्यन दलालने आपल्या भेदक गोलंदाजीने मांडवी मुस्लिम संघाला अवघ्या ५९ धावांवर गुंडाळत संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रथम फलंदाजी करताना अथर्व आणि अर्जुनने मोठ्या खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८० धावांची शतकी भागीदारी केली. अथर्वने आक्रमक खेळी करताना ५७ चेंडूत १४ चौकार आणि तीन षटकार मारत नाबाद शतक झळकवले. तर अर्जुनने ३० चेंडूत ११ चौकार आणि पाच षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. या डावात प्रशांत मोरे आणि प्रशांत ठोंबरे यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. विजयाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नांत आर्यनच्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीसमोर मांडवी मुस्लिमच्या फलंदाजानी अक्षरशः शरणगती पत्करली .आर्यनने ४ षटकात २ निर्धाव षटकांसह अवघ्या ७ धावांमध्ये प्रतिस्पर्ध्यांचा अर्धा संघ गारद केला. निरेक गावंड आणि यश जठारने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
संक्षिप्त धावफलक : स्पोर्टींग क्लब कमिटी : २० षटकात २ बाद २४८ (अथर्व अधिकारी नाबाद १०३, अर्जुन बागायतकर १०४, प्रशांत मोरे ४-३५-१, प्रशांत ठोंबरे ३-२९-१) विजयी विरुद्ध मांडवी मुस्लिम क्लब : १३.१ षटकात सर्वबाद ५९ (आर्यन दलाल ४-२-७-५,निरेक गावंड २.१-१-१३-२, यश जठार ३-१४-२).
