शुक्रवारपासून रामशेठ ठाकूर मैदानावर रंगणार कबड्डीचा थरार
पनवेल : दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्‌डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवेनोडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्‌डी २०२६ स्पर्धेचा उदघाटन सोहळा शुक्रवार दिनांक २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते होणार आहे.
उलवे नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जवळील रामशेठ ठाकूर मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील यांची तर  शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे,  शिव छत्रपती पुरस्कार विजेते सुर्यकांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ०६ वाजता पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाचे अध्यक्ष म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह ऍड. आस्वाद पाटील यांची तर अर्जुन पुरस्कार विजेते शकुंतला खटावकर, अर्जुन पुरस्कार विजेते अभिलाषा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जिल्ह्यातील १९८ पुरुष कबड्डी संघ आणि ३२ महिला संघ सहभागी होणार आहेत. यातून निवड झालेल्या खेळाडूंचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने जवळपास १०० पंच कार्यरत असणार आहेत. सुसज्ज अशी चार क्रीडांगणे त्याचबरोबर मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच इतर पूरक सुविधा या ठिकाणी आहे.
या स्पर्धेचा कबड्डी रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यवाह चित्राताई पाटील,  रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा संयोजन समितीचे सचिव शरद कदम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *