जय मल्हार चषक पर्व पहिले जल्लोषात
मुकुंद रांजणे
माथेरान : विविध क्षेत्रात भरारी घेत असताना यावेळी प्रथमच क्रीडा क्षेत्रात उत्तुंग झेप घेत जय मल्हार संघाने १६ ते १८ दरम्यान येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलावर भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामने आयोजित केले होते त्यास क्रीडा प्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. या सामन्यात विक्रांत संघाला विजेतेपद प्राप्त झाले असून मुकदर क्रिकेट संघाला उप विजेतेपद मिळाले आहे. प्रथम क्रमांकासाठी नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या कडून रोख रक्कम रुपये ६१००० आणि आकर्षक चषक तसेच उप विजेत्या संघाला नगरसेविका प्रतिभा घावरे यांच्याकडून ३१००० ₹ रोख आणि आकर्षक चषक मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, झेल, मॅन ऑफ दि मॅच असे अनेक पारितोषिक खेळाडूंना प्रदान करण्यात आली.
सलग तीन दिवस येथील क्रीडा संकुलावर प्रेक्षकांची मोठया प्रमाणावर गर्दी पहावयास मिळाली.विजेत्या विक्रांत संघाचे धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सर्व संघांना शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण नियोजनासाठी मंगेश गोरे, रामा आखाडे,सुरेश आखाडे, किरण आखाडे,दत्ता, रवी, तुषार,ओंकार, मनोज, रमेश,संजय तसेच जय मल्हार संघाच्या समस्त पाठीराख्यांनी हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट समालोचन मंगेश मोरे, सागर जोशी, मयुरेश कदम, अनिल नाईकडे यांनी करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *