टरबूजावर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची कोरीव प्रतिकृती
कल्याण : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याण येथील कला शिक्षक यश महाजन यांनी यावर्षी टरबूजावर ब्लेडच्या साहाय्याने महाराजांची आकर्षक कोरीव प्रतिकृती साकारली. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांना सुमारे दोन ते अडीच तासांचा कालावधी लागला.
दरवर्षी न चुकता महाराजां विषयी चा आपला श्रद्धाभाव व्यक्त करण्यासाठी महाजन विविध माध्यमांचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र रेखाटत असतात. यामध्ये भाकरी, पिंपळाचे पान, तुळशीचे पान, केळीचे पान, दगड, माती, तांदूळ, खडू वरील कोरीव काम तसेच रांगोळी, पोर्ट्रेट आणि कॅनव्हास पेंटिंग अशा विविध माध्यमांचा समावेश आहे.
यंदा त्यांनी टरबूज वर तसेच मोराच्या पंखांवर ही महाराजांची प्रतिकृती साकारत आपल्या कले. द्वारे अभिवादन केले आहे. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीचे शालेय स्तरावर तसेच परिसरात कौतुक होत आहे. कलेच्या माध्यमातून इतिहासाबद्दल आदर आणि प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा हा उपक्रम स्तुत्य मानला जात आहे.
