पुणे – छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, वर्ल्डक्लास असे त्याचे आयोजन असेल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे आज शिवजयंती निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या आधीपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडवलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. ‘हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे,’ अशी भूमिका त्यांनी घेतली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी किल्ला, ही शिवजन्मभूमी केवळ ऐतिहासिक स्थळ नव्हते, तर ते त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे प्रेरणास्थळही होते. पवित्र शिवनेरी किल्ल्याविषयी केवळ जिव्हाळाच नव्हता, तर या शिवजन्मभूमीचे सौंदर्य वाढावे, तिचा ऐतिहासिक वारसा जपला जावा आणि भावी पिढ्यांना अभिमानाने दाखवता यावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारातून ‘किल्ले शिवनेरी विकास आराखडा’ साकार झाला आणि या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला.
