माथेरान पालिकेच्या सभांचे थेट प्रक्षेपण नागरिकांसाठी व्हावे भास्कर शिंदे यांची मागणी
मुकुंद रांजाणे
माथेरान : राज्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या नगरपालिका क्षेत्रात ज्यावेळी विविध विषयांवर महत्वपूर्ण निर्णय अथवा विकासकामे होण्यासाठी सभा आयोजित करण्यात येते त्याबाबत इत्यंभूत माहिती गावातील जनतेला माहीत व्हावी यासाठी  होणाऱ्या सभांचे थेट प्रक्षेपण द्वारे दाखविण्यात येत असते त्याच धर्तीवर माथेरानमध्ये सुध्दा नगरपरिषदेच्या सभागृहात होणाऱ्या सभांचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे अशी मागणी येथील उद्योजक भास्कर शिंदे यांनी केली आहे.
अनेकदा काही महत्वपूर्ण कामे परस्पर एखाद्या मर्जीतील ठेकेदाराला सुपूर्द केली जातात आणि त्यामागे खुप काही गौडबंगाल दडलेले असते. त्यामुळे होणारी विकासकामे नियोजनशून्य होऊन निधीचा अपव्यय होत असतो. ज्यावेळी सभांचे आयोजन करण्यात येते त्यावेळी चालू सभेत लोकनियुक्त सदस्य अधिकाऱ्यांचे लांगुलचालन तर करीत नाही ना किंवा एखाद्या अधिकाऱ्यांच्या दबावाखाली कोणता सदस्य नाही ना याची शहानिशा होण्यासाठी जर का सभागृहात होणाऱ्या सभांचे चित्रण प्रदर्शित केल्यास जनतेचा सुध्दा आत्मविश्वास वाढेल की ज्यांना आपण अमूल्य मत देऊन ज्यांना कार्यक्षम सदस्य समजून सभागृहात पाठवले आहे.ती मंडळी नक्कीच या गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत का ? सकारात्मक कामांना पाठबळ देत आहेत की नाही हे मतदारांना पाहणे सुध्दा आवश्यक आहे त्यामुळेच आपले मत वाया गेलेले नसून सार्थकी लागले आहे. अशा भावना निश्चितपणे त्यांना पहावयास मिळू शकतात.निवडून दिलेले लोकप्रतिनिधी खरोखरच आत्मीयतेने कामे करतात की नाही याचे ज्ञान आणि माहिती प्रत्येक घटका पर्यंत जाणे गरजेचे आहे. त्यासाठी आगामी काळात होणाऱ्या प्रत्येक सभांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे परंतु सत्ताधारी गट काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रशासकीय राजवटीत कार्यालय आहे की नाही असे चित्र निर्माण झाले होते. कोणत्याही कर्मचाऱ्यांवर बंधन नसल्याप्रमाणे सर्व कारभार सुरू होता. जो तो आपल्या सोयीनुसार कार्यालयात हजर राहत होता.दिवसभरात बहुतेक कर्मचारी हे जेमतेम दोन ते तीन तास काम करताना दिसत होते.तर काही इमानेइतबारे कर्तव्य पार पाडत होते.निदान यापुढे तरी सत्ताधारी गटाचा संपूर्ण कार्यालयावर अंकुश राहील का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कोट
काही वर्षांपूर्वीच पालीकेच्या सर्व सभा लाईव्ह केल्या जाव्यात अशी मागणी मी स्वतः तत्कालिन बहुमत असणाऱ्या सत्ताधारी गटाकडे केली होती.नगरपरिषदेच्या सर्व सभा लाईव्ह झाल्या पाहिजेत आजही या मागणीवर आम्ही ठाम आहोत.आपले लोकप्रतिनिधीं काय काम करतात,प्रभागाचे,गावाचा हिताचे निर्णय कसे घेतात हे पाहण्याची संधी लाईव्ह सभेमुळे मतदार नागरिकांना भेटू शकते.
भास्कर शिंदे—उद्योजक माथेरान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *