पोलिस प्रशासन पालिकेची संयुक्‍त कारवाई

मुंबई : मुंबईतील अनेक रस्ते अनधिकृत फेरीवाल्‍यांनी व्यापल्याने नागरिकांना चालणे खूपच कठीण झाले आहे. यासंदर्भात बेकायदा आणि विनापरवाना विक्रेत्यांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत. त्‍यामुळे पोलिस प्रशासन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्‍त कारवाई करीत फेरीवाल्‍यांना हटवले.

घाटकोपर पश्चिम श्रद्धानंद रोड आणि हिराचंद देसाई रोडवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली. पदपथावर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येते. वारंवार कारवाई होऊनही फेरीवाले हटत नाहीत. याबाबत नागरिक सातत्याने स्‍थानिक पोलिस, पालिका विभाग कार्यालयात तक्रारी दाखल करतात. घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांविरोधात नागरिकांनी एकत्र येत कारवाईसंदर्भात मोहीम सुरू केली आहे.

रेल्वे प्रवाशांना फेरीवाल्यांची अडचण

घाटकोपर रेल्वे प्रवासी आणि मेट्रो स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्‍थानक परिसरात अनधिकृतरीत्या बसणाऱ्या फेरीवाल्यांचा मनस्ताप सहन करावा लागतो. संध्याकाळच्या वेळेस फेरीवाले रस्ते आणि पदपथ अडवत असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना नाकीनऊ येते. मागच्या काही महिन्यांपासून पालिकेने स्‍थानक परिसरात ‘नो हॉकर्स झोन’चे फलक परिसरात लावले आहेत. तरीदेखील फेरीवाले बिनधास्त आपले बस्तान मांडून असतात. त्‍यामुळे फेरीवाल्‍यांविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. रेल्‍वे स्‍थानक परिसरात बस्तान मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर संयुक्तरीत्या कारवाई करत रस्ते मोकळे केले आहेत.

– शरद शेटे, पोलिस उपनिरीक्षक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *