रहिवाशांचा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा

ठाणे : घोडबंदर येथील वाघबीळ गावातील रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सांडपाणी साचत असून या पाण्यामधून नागरिकांना वाट काढत घर गाठावे लागत आहे. हे पाणी अंगावर उडाल्यास खाज येण्याचे प्रकार घडत असून यामुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर उतरून रस्त्यावर वाहणारी गटारगंगा बंद करण्याची मागणी केली. ही समस्या सुटली नाहीतर, येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रहिवाशांनी यावेळी दिला.

घोडबंदर भागाचे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले आहे. या भागात मोठी मोठी गृह संकुले उभी राहत असून याठिकाणी भूमिपुत्रांची गावे आहेत. वाघबीळ गावात रस्त्यावर वाहणाऱ्या सांडपाण्याने गावकऱ्यांची वाट अडविल्याचे समोर आले आहे. या रस्त्यावर गेल्या १० वर्षांपासून सांडपाणी वाहत असून रस्त्यावर काही भागात सांडपाणी साचून तिथे मोठे डबके तयार झाले आहे. या पाण्यावर हिरवा रंगाचे हे पाणी दिसून येत असून या पाण्यामुळे गावकऱ्यांना रस्त्यावर चालणे शक्य होत नाही. रस्त्याच्या कडेने वाट करून त्यांना घरापर्यंतचा प्रवास करावा लागतो. त्यातही पाणी अंगावर उडाले तर, अंगाला खाज सुटते. महापालिकेच्या गलथान कारभारामुळे हा त्रास सहन करावा लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

वाघबीळ गावातील सांडपाण्याच्या समस्येमुळे हैराण झालेल्या रहिवाशांनी बुधवारी सकाळी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ठाणे शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच वाघबीळ गावातील सांडपाणी रस्त्यावर साचण्याची समस्या आहे. या संदर्भात वारंवार पत्र व्यवहार करूनही महापालिका प्रशासन कोणतीच पाऊले उचलत नसल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. येत्या दिड महिनाभरात पावसाळा सुरु होत असून पावसाळ्यात येथून चालणे शक्य होणार नाही, असे रहिवाशांनी सांगितले. रस्त्यावर वाहणारी गटारगंगा बंद करण्याची मागणी करत ही समस्या सुटली नाही तर, येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा रहिवाशांनी यावेळी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *