टीआयएसएस प्रशासनाचा निषेध
अनिल ठाणेकर
ठाणे : पीएचडीसाठी अभ्यास करणारे दलित विद्यार्थी नेते रामदास यांना दोन वर्षे निलंबित करण्याच्या व रामदास यांना टीआयएसएसच्या सर्व कॅम्पसमध्ये प्रवेशास बंदी घालण्याच्या, मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) च्या प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करीत असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व सरचिटणीस डॉ. विजू कृष्णन यांनी व्यक्त केली आहे.
रामदास हे प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरम (पीएसएफ) चे सरचिटणीस होते, आणि आज ते एसएफआय च्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य असून एसएफआय च्या महाराष्ट्र राज्य कमिटीचे सहसचिव आहेत. युनायटेड स्टुडंट्स ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनांच्या देशव्यापी मंचाचेही ते प्रतिनिधी आहेत. रामदास यांच्याविरुद्ध काढण्यात आलेला निलंबनाचा आदेश हा भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार असलेल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर तसेच मतस्वातंत्र्यावर हल्ला करण्याचे जे देशव्यापी कारस्थान चालले आहे, त्याचाच एक अविभाज्य भाग आहे. टीआयएसएस च्या प्रशासनाने या कारस्थानात सामील होऊन आणि रामदास यांच्या कृतींवर राष्ट्रविरोधी हा ठराविक शिक्का मारून लोकशाही मूल्ये आणि शैक्षणिक स्वातंत्र्यावर घाला घातला आहे. रामदास यांचे निलंबन हे अशा प्रकारचे एकच उदाहरण नाही. देशातील अनेक कॅम्पसवर होत असलेल्या हुकूमशाही हल्ल्यांचा तो भाग आहे. भाजप व आरएसएस यांच्या केंद्र सरकारच्या विद्यार्थीविरोधी आणि शिक्षणविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठवाल तर त्याचा हाच परिणाम होईल अशी देशातील समग्र विद्यार्थी समुदायाला दिलेली ती धमकी आहे. पण विद्यार्थी समुदाय अशा हल्ल्यांचा व धमक्यांचा धैर्याने सामना करत आहे. अलीकडेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुकांत डाव्या विद्यार्थी संघटनांच्या एकजुटीने आरएसएस च्या अभाविप या विद्यार्थी संघटनेचा जो धुव्वा उडवला, त्यातून हवा कोणत्या दिशेने वाहत आहे याची झलक पाहायला मिळते. टीआयएसएस चे विद्यार्थी सुद्धा अशा हल्ल्यांच्या प्रतिकाराच्या अग्रभागी राहतील याचा आम्हाला विश्वास आहे. रामदास यांचे निलंबन ताबडतोब मागे घ्यावे, आणि स्वातंत्र्य व लोकशाहीवरील अशा हल्ल्यांविरुद्ध विद्यार्थी, शेतकरी, आणि सर्व जनतेनेच आपला बुलंद आवाज उठवावा, असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने डॉ. अशोक ढवळे व डॉ. विजू कृष्णन यांनी केले आहे.